
आमच्या लग्नानंतर मी घर आवरत असताना मला एक रजिस्टर सापडले. त्यात वृत्तपत्रातील कात्रणे चिकटवलेली होती. बाबा दहावीत असताना दहा देशांचा प्रवास करून आले होते. कॅनडा, जपान, अमेरिका वगैरे देशांचे प्रवासवर्णन त्या वेळच्या ‘अंजिठा’ पेपरमध्ये ओळीने छापून आले होते. माझ्या मनात एक विचार आला, ह्याचे पुस्तक केले तर...! आणि मी त्यांना तो विचार बोलून दाखवला. त्यांना पण पटले. पण पुस्तक काढायचे तर आर्थिक तरतूद कुठून करणार? मग प्रकाशक शोधणे सुरू झाले; पण फार गमतीदार अनुभव येत गेले. कोणी म्हणायचे, ‘आम्ही छापतो, पण खर्च तुम्ही करा.’ दुसरे म्हणायचे, ‘अर्धा खर्च आम्ही करतो. अर्धा तुम्ही करा.’ अहो हा खर्च करण्याची ताकद असती, तर प्रकाशक कशाला शोधत फिरलो असतो. एके दिवशी बाबांचे मित्र सुरेंद्र जोंधळे आमच्याकडे आले होते. त्यांना पण ही कल्पना आवडली.
ते म्हणाले, ‘सर, तुम्ही पुनर्लेखन करा. छापायचे नंतर बघू.’ यांनी लगेच, काही दिवसांत त्याचे पुनर्लेखन पूर्ण केले. एक दिवस विद्यापीठातील क्वॉर्टरमध्ये भालचंद्र नेमाडे सरांकडे गेलो. त्यांना पुस्तक काढण्याविषयी विचारले. प्रकाशक मिळत नाही काय करावे?