
भाऊसिंगजी रोडवर म्हणजेच ऐतिहासिक भवानी मंडप, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच आइस्क्रीमची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेले तीन ब्रॅंड्स आहेत. आणि या तिन्ही ठिकाणी कायम आइस्क्रीमप्रेमींची गर्दी ठरलेली असते. त्याशिवाय इतरही अनेक ब्रॅंड्स आहेतच. ‘आम्ही बाराही महिने फक्त आणि फक्त आइस्क्रीमच विकतो,’ असे ही मंडळी आवर्जून सांगतात.
कोल्हापूर हे जिंदादिल माणसांचे शहर. जे काही करायचे ते जगावेगळे आणि ‘जगात भारी’ हा इथल्या माणसाचा ध्यास. कोल्हापूर पूर्वीपासूनच समृद्ध दुधदुभत्याचा जिल्हा. ताज्या दुधाची मुबलकता अधिक. त्यामुळे देशभरात आइस्क्रीम, कोल्ड्रिंक हाऊसची संकल्पना रुजत असताना ती कोल्हापुरातही रुजली यात नवल नाही, आणि तीही ११५ वर्षांपूर्वी!