

आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com
पत्र लिहिणारा एकटा स्वतःशी बोलत असतो, पण दुसऱ्यासाठी. वाचणारा एकटा वाचत असतो, पण लिहिणाऱ्याच्या अनुपस्थितीत त्याची उपस्थिती अनुभवत असतो. फ्रान्झ काफ्काने पत्रलेखनाची तुलना दोन भुतांच्या संवादाशी केली होती. रंगमंचावर हे दुहेरी एकटेपण आणखी गडद होतं. पत्र वाचन असो, सादरीकरण असो वा पत्ररूपी नाटक. लिहिणारा आणि वाचणारा यांच्यातील नाट्यमयता हे यांत समान सूत्र असतं.
माणसाची नेमकी व्याख्या करायची झाली तर ती अशी करता येईल : माणूस म्हणजे पत्रं लिहिणारा प्राणी. ब्रिटिश लेखक लुईस कॅरल यांनी केलेलं हे मार्मिक निरीक्षण गमतीदार वाटतं, पण विचार करायला लावतं. माणूसच असा प्राणी आहे जो आपलं मन कागदावर उतरवतो आणि ते दुसऱ्या माणसाला पाठवतो. एवढंच नाही, तर कधी कधी त्या कागदाला वर्षानुवर्षं जपूनही ठेवतो.