

India PQC security risk
esakal
विवेक सुतार, जागतिक तंत्रज्ञान घडामोडींचे विश्लेषक
भारताच्या डिजिटल सार्वभौमत्वाला असलेल्या धोक्यावर आणि प्रशासकीय दिरंगाईवर टाकलेला प्रकाश.
जगाची गणिती गुंतागुंतीवर आधारित असलेली विद्यमान सांकेतिक सुरक्षा व्यवस्था आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. गेली पन्नास वर्षे अभेद्य वाटणारी ही सुरक्षाव्यवस्था आता कुचकामी ठरणार आहे. एखादी पेटी कायमची स्वतःकडे ठेवायची असेल, तर आजच तिचे कुलूप तोडण्याची घाई करण्याची गरज नसते, हे हेरून शत्रूने आपली माहिती गोळा करायला केव्हाच सुरुवात केली आहे. आज गोळा करा आणि भविष्यात उलगडा या रणनीतीनुसार, शत्रूराष्ट्रे आपले अत्यंत सुरक्षित सरकारी संवाद, आर्थिक नोंदी आणि लष्करी माहिती चोरून अवाढव्य सर्व्हरवर साठवत आहेत. प्रगत क्वांटम कॉम्प्युटरच्या प्रतीक्षेत ते आहेत. जागतिक आर्थिक मंचाने या संभाव्य संकटाला ‘आर-डे’ असे नाव दिले आहे. हा तो दिवस असेल जेव्हा जगाला साक्षात्कार होईल की आपले प्रत्येक रहस्य एका मूक प्रेक्षकाप्रमाणे आधीच उघडे पडले आहे. ही केवळ सायबर सुरक्षेतील त्रुटी नसून, राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला लागलेली एक अदृश्य आणि खोल जखम आहे. धोक्याची चाहूल लागल्यानेच ऑगस्ट २०२४ मध्ये जागतिक मानके ठरवणाऱ्या संस्थांनी पोस्ट-क्वांटम मानकांना अंतिम रूप देत सर्व जगाला अत्यंत तातडीने नव्या सुरक्षित व्यवस्थेकडे वळण्याचे आदेश दिले आहेत. युरोप आणि अमेरिका या दशकाच्या अखेरीस हे स्थलांतर पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत.