Premium|Gen Z Financial Freedom : कमाईपेक्षा पैशाचा योग्य वापर महत्त्वाचा; जेन झीचा आर्थिक स्वातंत्र्याचा नवा विचार

Gen Z Financial Freedom : जेन झीच्या बदलत्या श्रीमंतीच्या व्याख्येत पैसा, वेळ, स्वातंत्र्य आणि मानसिक समाधानाला असलेले महत्त्व तसेच डिजिटल युगातील खर्च आणि आर्थिक नियोजनाचा विचार.
Gen Z Financial Freedom

Gen Z Financial Freedom

esakal

Updated on: 

डिजिटल पैशाशी जोडलेलं माझं नातं

वेदांतिका साळुंखे, सातारा

‘जेन झी’ म्हणजे १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेल्या लोकांची पिढी होय. ‘मिलेनिअल्स’नंतरची आणि जनरेशन अल्फा (जेन अल्फा) पूर्वीची ही पिढी सध्या तरुण वयात आहे. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ असेही म्हणतात, कारण ते तंत्रज्ञानाच्या युगात वाढले आहेत. अनेकदा ही पिढी मौजमजेवर अधिक पैसा खर्च करताना दिसते, मग यांना भविष्याची चिंता नाही का, असा प्रश्‍न आधीच्या पिढ्यांना पडतो. तर, ही ‘जेन झी’ पैशाबाबत नेमका काय आणि कसा विचार करते, पैशाबाबत तिचं म्हणणं तरी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सकाळ मनी’च्या वतीनं ‘इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज’मधील काही विद्यार्थ्यांचे ‘मनी’चे हितगुज जाणून घेतले. ते त्यांच्याच शब्दांत.

माझी श्रीमंतीची व्याख्या...

यशश्री आचार्य, मडगाव

‘श्रीमंती’ म्हटलं, की आपल्या डोळ्यांसमोर मोठा बंगला, आलिशान गाडी, भरपूर बँक बॅलन्स आणि मोठ्या पदावरची नोकरी, असं चित्र डोळ्यासमोर येतं. अनेक वर्षांपासून समाजात श्रीमंतीची हीच पारंपरिक व्याख्या रुजलेली आहे. पण मला आणि माझ्या पिढीतील अनेक तरुणांना कायम हा प्रश्‍न सतावतो, तो म्हणजे हीच खरी श्रीमंती आहे का? कारण अनेकदा भरपूर पैसा कमावणाऱ्या व्यक्तीकडे तो पैसा उपभोगण्यासाठी पुरेसा वेळच नसतो. पैसा कमावणे, तो टिकवणे, गुंतवणूक करणे आणि मालमत्तेची देखभाल करणे यामध्ये आयुष्याचा मोठा भाग निघून जातो. मग त्या संपत्तीचा आनंद घेण्यासाठी वेळ उरतो तरी किती? त्यामुळे पैशासोबत वेळ, स्वातंत्र्य, मानसिक समाधान आणि स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण असणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. आर्थिक स्थैर्य हे निश्चितच आवश्यक आहे. मात्र, पैसा हा आयुष्याचा एक भाग असावा; संपूर्ण आयुष्यच पैसा कमावण्यासाठी खर्च होऊ नये. खरी श्रीमंती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढण्याची क्षमता. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येणे, मित्रांसोबत क्षण अनुभवता येणे, आवडते छंद जोपासता येणे, नवी ठिकाणे पाहता येणे आणि आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेता येणे, हीसुद्धा संपत्तीच आहे, असे मला वाटते. आयुष्य मर्यादित आहे आणि त्यातील प्रत्येक वर्ष केवळ काम आणि पैसा कमावण्यात घालवणे आवश्यक नाही, असे माझे मत आहे. त्यामुळे जेव्हा मी माझ्या मूळ गावी, गोव्यातील मडगावला परत जाते, तेव्हा तिथले शांत जीवन पाहून मला जाणवते, की केवळ पैसा आणि नोकरीच श्रीमंती देत नाहीत; तर या मोठ्या जगाचे आणि त्याच्या सौंदर्याचे अनुभव घेण्यासाठी मिळालेला वेळ ही सुद्धा खरी श्रीमंती आहे.

माझ्यासाठी आणि माझ्या पिढीसाठी श्रीमंती म्हणजे केवळ बँक खात्यातील आकडा नाही. ती म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्याइतका पैसा, स्वतःसाठी असलेला पुरेसा वेळ, आपल्या निर्णयांवर असलेले स्वातंत्र्य आणि त्या सगळ्याचा आनंद घेण्याची मानसिक शांतता. पैसा आपल्याला साधने देतो; पण समाधान आपल्याला आपली माणसं, निसर्गाचे सौंदर्य आणि स्वतःसाठी हवा तितका वेळ देते आणि म्हणूनच समाधानी माणूसच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. त्यामुळे मला केवळ श्रीमंत व्हायचे नाही, तर स्वातंत्र्य आणि समाधानाने आयुष्य जगायचे आहे.

शेवटी, श्रीमंतीचा हिशेब फक्त आपल्या बँक खात्यात किती पैसा आहे यावर होऊ नये; तर आपल्या आयुष्यात किती समाधान, किती माणसं, किती सुंदर क्षण आणि स्वतःसाठी किती वेळ आहे यावरही व्हावा, असे मला वाटते.

Loading content, please wait...