

Ghazal Singing
esakal
भीमराव पांचाळे - sakal.avtaran@gmail.com
गझलच्या सुरांतून माणूस, त्याची अस्मिता आणि समाजाकडे पाहण्याची दृष्टी यांचा शोध घेताना काही शेर आयुष्यभर सोबत राहतात. नसीम रिफअत यांच्या एका गझलेतील ‘जहाँ से आदमी छोटा दिखाई देता है’ हा शेर असाच मनात घर करून राहिला...
गझल गायकीच्या माझ्या पंचावन्न वर्षांच्या प्रवासात गझल स्वरबद्ध करताना, गाताना, अनुभवताना आणि अभ्यासताना मनाची व मेंदूची जी काही मशागत झाली, जो मनस्वी आनंद मिळाला त्याला तोड नाही.
या प्रवासात भेटले उर्दूचे एक आला शायर जनाब ‘नसीम’ रिफअत आणि त्यांची सर्वांग सुंदर गझल... आकाशवाणीच्या कॉन्सर्टसाठी त्यांच्याच शहरात, ग्वाल्हेरला गेलो होतो. तिथे मी गायलेल्या त्यांच्या एका अप्रतिम गझलचा हा हासिले -
गझल शेर...
मुलाहिजा हो -
मिटा दो दहर से ऐसी
बलंदियों के निशाँ
जहाँ से आदमी छोटा दिखाई देता है
शेरो-सुखनच्या दुनियेतला हा मशहूर गझलगो शायर मध्य प्रदेशच्या एका दौऱ्यात माझ्या गझलगायकीचा चाहता झाला आणि आम्ही जानी दोस्त झालो. मुंबईला आले, की नसीम साहेब नागपाडा सोडून त्या वेळच्या आमच्या चाळीतल्या घरात मुक्कामाला यायचे. गीताचे अब्बा आणि भाग्यश्रीचे नाना झाले होते ते. भाग्यश्रीचे लग्न लावून परतल्यानंतर काही महिन्यांतच गेले, असंख्य आठवणी आणि अनमोल गझलांचा खजिना देऊन मरहूम झाले.