
Jinji Fort
esakal
जिंजी म्हणजे दक्षिण भारतातील विशेषतः तमिळनाडूतील अत्यंत महत्त्वाचा असा अजिंक्य आणि अभेद्य किल्ला. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची जिंजी किल्ला आठ वर्षे राजधानी होती. राजांनी मे १६७७ मध्ये मोठ्या कौशल्याने जिंजी जिंकून घेतला. जुल्फीकारखानाला आठ वर्षे तो जिंकता आला नाही, इतका तो अजिंक्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. दुसरी राजधानी रायगड होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि मृत्यू रायगडावर झाला. त्यानंतर संभाजीराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. औरंगजेबाने त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या केल्यानंतर दूरदृष्टीच्या मुत्सद्दी महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक केला; परंतु त्यांनी तिथे न थांबता दक्षिणेत जावे आणि तेथून राज्यकारभार करावा म्हणजे मोगली फौजेची विभागणी होऊन स्वराज्य राखता येईल, असे त्यांचे नियोजन होते. नियोजनाप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी रायगडावरून बाहेर पडले आणि मजल-दरमजल करत १ नोव्हेंबर १६८९ रोजी तमिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर पोहोचले. तिथे त्यांनी पुढे सुमारे आठ वर्षे स्वराज्याचा कारभार केला. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची जिंजी ही आठ वर्षे राजधानी होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात जिंजी ही स्वराज्याची तिसरी राजधानी होती.