
भारतीयांकडून डॉलरची केली जाणारी मागणी प्रचंड असल्यामुळे मागणी आणि पुरवठा या तत्त्वानुसार एक वस्तू म्हणून डॉलरचा भाव रुपयाच्या तुलनेत बराच चढा आहे. हीच गोष्ट इतर देशांच्या डॉलर्सशी असणाऱ्या विनिमय दरांबद्दलसुद्धा दिसून येते. मग प्रश्न उरतो, सगळ्या देशांकडून डॉलरची एवढी मागणी कशासाठी होत राहते आणि ती कमी होण्याची शक्यता आहे का?
अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष करीत असलेल्या व्यापार युद्धाच्या पाठीमागे ब्रिक्स देश डॉलरला पर्याय उभा करून आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे डी-डॉलरायझेशन करण्याच्या मार्गावर आहेत आणि काहीही करून त्यांना यापासून रोखायचे हा विचार आणि भीती आहे, असा एक मोठा मतप्रवाह आहे. यासंदर्भात अनेकांच्या मनात असाही प्रश्न उभा राहतो, की डॉलरचा भाव इतका जास्त कसा, म्हणजे एक डॉलरसाठी ८७ रुपये मोजावे लागत असल्यास तेवढ्या रुपयांत भारतात खरेदी करता येणाऱ्या वस्तू आपण एक डॉलर खर्च करून अमेरिकेत खरेदी करू शकू किंवा कसे? बहुतेक वेळेला या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच असते आणि खरेदी करण्याच्या क्षमतेवर (Purcasing Power Parity – PPP) डॉलर आणि रुपया यांचे विनिमय दर ठरवल्यास तो दर एका डॉलरसाठी फक्त २० रुपयेच येतो.