
क्रिस्टोफर नोलनचा ‘ओपेनहायमर’ दोन वर्षांपूर्वी चित्रपटगृहात आला. त्याने जगभरात जवळजवळ एक अब्ज डॉलर कमावले आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सात ऑस्कर आणि पाच गोल्डन ग्लोब जिंकले. त्याआधी दोन वर्षांपूर्वी, अॅडम मॅकेचा ‘डोन्ट लुक अप’ (वर बघू नका बरं) हा ‘नेटफ्लिक्स’वर खळबळ उडवून देणारा चित्रपट आला. त्याने पहिल्या २८ दिवसांत ३६ कोटीहून अधिक वेळा पाहिल्या गेलेल्या तासांचा टप्पा गाठला. त्यानंतर तो नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मच्या इतिहासातील दुसरा सर्वाधिक पाहिलेला चित्रपट होता.
‘ओपेनहायमर’ अणुबॉम्बचे जनक डॉ. जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांची कहाणी सांगतो. त्याच्या शेवटच्या दृश्यात, तो अल्बर्ट आइन्स्टाइनला इशारा देतो, की त्यांनी अशी साखळी प्रतिक्रिया सुरू केली आहे जी कधीतरी जगाचा नाश करू शकते. ‘डोंट लुक अप’मध्ये लिओनार्डो डिकॅप्रियो एका शास्त्रज्ञाची भूमिका करतो. तो पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणाऱ्या धूमकेतूचा शोध लावतो. तर मेरिल स्ट्रीप अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका करते. ती पृथ्वी एका मोठ्या धोक्याचा सामना करत आहे, हे वास्तव स्वीकारण्यास नकार देते.
ती कपट आणि खोट्या प्रचाराद्वारे लोकांचे लक्ष त्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करते. शेवटी, धूमकेतू आदळतो आणि पृथ्वीवरील सर्व जीवन संपते. लार्स वॉन ट्रायरच्या ‘मेलान्कोलिया’चा शेवट एका ग्रहाच्या पृथ्वीशी टक्कर होण्याने होतो. लोरेन स्काफेरियाच्या ‘सीकिंग अ फ्रेंड फॉर द एंड ऑफ द वर्ल्ड’ हा चित्रपट एका उल्कापिंडाच्या प्राणघातक मार्गावर आधारित आहे. या प्रत्येक कथेत, वैज्ञानिक आपत्तीची चेतावणी देतात. प्रत्येकवेळी नेते धोका नाकारतात किंवा त्याला कमी लेखतात.