

Global Maritime Trade
esakal
हर्ष काबरा - saptrang@esakal.com
होर्मुझपासून मलाक्कापर्यंत सागरी व्यापाराच्या नाड्यांवर संकटांचे सावट आहे. या अस्थिरतेने भारतापुढे व्यापार, ऊर्जा सुरक्षा, महागाई आणि परकीय चलनाचे नवे पेच उभे केले आहेत. विकसित भारत घडवायचा असेल, तर भारताला अत्यंत भक्कम सागरी सामर्थ्य उभारावेच लागेल.
सागरी वाहतुकीच्या इतिहासात कसोटीचे २०२६ हे वर्ष म्हणून नोंदले जाणार आहे. जगातील तेल वाहतुकीचा एक-पंचमांश भार हाताळणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिका-इराण संघर्षामुळे जहाजांवरील हल्ले आणि नाकेबंदीचा धोका अजूनही कायम आहे. येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी बाब अल-मंदिब या सामुद्रधुनीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अमेरिकेच्या ४० टक्के कंटेनर वाहतुकीचा मार्ग असलेली पनामा कालवा प्रणाली तीव्र दुष्काळामुळे अल्प क्षमतेने सुरू आहे. आशियाची जीवनवाहिनी असलेली मलाक्का सामुद्रधुनी भू-राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील होत चालली आहे. परिमाणानुसार सुमारे ८० टक्के जागतिक वस्तू व्यापाराच्या केंद्रस्थानी असलेला सागरी कणा एकामागून एक येणाऱ्या संकटांनी हादरून गेला आहे.
महत्त्वाच्या सामुद्रधुनी आणि कालव्यांचा राजकीय व आर्थिक वर्चस्वासाठी वापर नवीन नाही. पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिशांनी सोळाव्या शतकापासून होर्मुझ आणि बाब अल-मंदिबवर ताबा मिळवून जकातीचे साम्राज्य उभारण्यासाठी युद्धे लढली. इजिप्तने १९५६मध्ये सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केल्याने युद्ध पेटले. पुढे १९६७च्या अरब-इस्राईल युद्धानंतर हा कालवा आठ वर्षे बंद राहिल्याने अब्जावधींचे नुकसान झाले. इराण आणि इराकने १९८०-८८ च्या युद्धात होर्मुझच्या सामुद्रधुनीत आणि आखातात इतरत्र तटस्थ जहाजांवर हल्ले चढवून आर्थिक दहशत माजवली. अमेरिकेने १९०३मध्ये पनामावर दबाव आणून कालवा बांधला. दरम्यान १९७७मध्ये हस्तांतरणाचे करार होऊनही १९९९पर्यंत त्यावर अमेरिकेचेच नियंत्रण होते; स्थानिकांना रोजगार संधींपासून दूर ठेवले गेले आणि कालव्यातून मिळणारे पारभाडे वॉशिंग्टनच्या तिजोरीत जमा होत राहिले. मलाक्कामध्ये वसाहतवादी सत्तांनी व्यापारासाठी झुंज दिली आणि स्थानिक व्यापाराची गळचेपी केली; स्थानिक राज्यकर्त्यांनी चाचेगिरी आणि खंडणीचा आधार घेतला. आज या सागरी मार्गांतून मूल्याच्या दृष्टीने जगातील एक-पंचमांशपेक्षा अधिक सागरी व्यापार होतो. यापैकी १६ टक्के व्यापार बाब-अल-मंदिब, ८ टक्के होर्मुझ आणि ७ टक्के पनामा कालव्यातून होतो. चीनच्या कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या आयातीचा सुमारे ८० टक्के हिस्सा मलाक्का सामुद्रधुनीतून येतो.