

Values Beyond Wealth and Education
esakal
दिलीप घाटे - dilipghate२@gmail.com
माणसाचं श्रेष्ठत्व हे त्याच्या उच्च शिक्षणावर, अंगावरच्या ब्रँडेड कपड्यांवर किंवा राहणीमानाच्या झगमगाटावर ठरत नाही, तर ते त्याच्या आचारावर, विचारांच्या परिपक्वतेवर आणि नीतिमत्तेवर ठरतं. आयुष्यात अवाढव्य कमावण्यापेक्षा कमावलेला पैसा कसा सांभाळायचा आणि नीतीने कसा वाटायचा, हे ज्याला जमलं तो खरा ज्ञानी. गोविंदकाकांची ही कथा याच सत्याची साक्ष देते.
सांगली जिल्ह्यातील मिरज हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर. याच मिरजेतील एका भव्य आणि जुन्या वाड्यात गोविंदकाकांचा जन्म झाला. वडिलांचा मोठा संसार. गोविंदकाका हे आठ भावंडांमध्ये सर्वांत धाकटे, म्हणजेच घराण्यातलं शेंडेफळ. वडील गावातले एक प्रख्यात ज्योतिषी होते. त्यांच्या अभ्यासाला आणि ज्ञानाला संपूर्ण परिसरात मान होता. ज्योतिषासोबतच घराण्याची कर्नाटकातील अथणी येथे वडिलोपार्जित शेतीही होती.
घरात मुलाबाळांची रेलचेल, संस्कारांची शिदोरी आणि अभ्यासू वातावरण होतं. काकांचे एक मोठे भाऊ अत्यंत आध्यात्मिक वृत्तीचे होते. त्यांनी लहानपणापासूनच जपजाप्य आणि ईश्वरभक्तीत स्वतःला झोकून दिलं होतं. पुढे त्यांनी अध्यात्मात मोठी प्रगती करून काही अलौकिक सिद्धीही प्राप्त केल्या होत्या. अशा सात्त्विक आणि संस्कारक्षम वातावरणात काकांचं बालपण गेलं. गोविंदकाका फारसं शिकू शकले नाहीत. त्यांचं शिक्षण प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेपुरतंच मर्यादित राहिलं; पण घरातून मिळालेले संस्कार, संयम आणि मूल्यांची शिकवण त्यांच्या मनात पक्की रुजली.