
वेठबिगारीच्या प्रश्नामुळे, किमान वेतनासाठी सुरू असलेल्या आग्रहामुळे आणि जमिनी मुक्त करण्याच्या आंदोलनामुळे आंदोलनाचं वातावरण गडद होतंच. विश्वातील प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तू विशिष्ट कंपनांच्या अभिव्यक्तीतून निर्माण झालेल्या ऊर्जेची रूपं मानली, तर आंदोलन हे अतितीव्र कंपनाच्या समुच्चयातून निर्माण झालेली महाकाय ऊर्जा, ज्यामुळे सारा समाज, संपूर्ण व्यवस्था, संपूर्ण पिढी ढवळून निघते, या अर्थाने आंदोलन महत्त्वाचं. आमचं आंदोलन अशा टप्प्यावर पोहोचलं होतं जिथे प्रत्येक मजूर, कार्यकर्ता, शेतकरी, आदिवासी यांच्यातल्या ऊर्जेला आता आम्हीही थांबवू शकत नव्हतो...
वेठबिगार मुक्त झाल्यानंतर त्यांच्यासोबत आदिवासी मजूर, शेतकरी तसंच बिगर आदिवासी छोटा शेतकरीसुद्धा सहभागी झाल्याने संघटनेची शक्ती वाढत होती. प्रत्येक जण काही ना काही स्वप्नं घेऊन संघटनेत येत होता. जगण्याची कला या प्रत्येकाला ज्ञात होती. विपरीततेतही कसं जगायचं, याची त्यांना जाण होती. लढण्यासाठी ते सर्व तयार होते. संघटनाशास्त्रात अगदीच नवखे असलेले आम्ही, या सामान्य लोकांकडून संघटनेचं शास्त्र शिकत होतो. हे कोणतंही पुस्तकी शास्त्र किंवा घोकंपट्टीनंतर येणारं ज्ञान नव्हतं, तर निव्वळ अनुभवाधारित होतं. बऱ्या-वाईट अनुभवातून संघटना बनवायची कशी, हे आम्ही शिकत होतो. हे सारे रूढार्थाने निरक्षर; परंतु अनुभवसंपन्न आदिवासीच आमचे गुरू बनले होते. पावला-पावलाला आम्ही या साऱ्यांकडून संघटनेचे, जगण्याचे आणि व्यावहारिक शहाणपणाचे धडे घेत होतो.