
ओंकार धर्माधिकारी
‘दुथडी वाहणाऱ्या नद्यांच्या काठी मात्र पाणीटंचाई’ ही विसंगती कोल्हापूर, इचलकरंजी शहरात पाहायला मिळते. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजना झाल्याने सांगलीचा पाणीप्रश्न सुटला. पण जत, आटपाडी तालुक्यांतील सुमारे शंभर गावांच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ अजूनही सरलेला नाही. सोलापूरची तर कथाच वेगळी. इथे पाणी वितरणातील त्रुटींमुळे वर्षभरच पाणीबाणी असते. जलस्रोतांचे प्रदूषण, पाणी वितरणातील त्रुटी आणि भूजल पातळी खालावणे अशा विविध कारणांनी दक्षिण महाराष्ट्रात पाणीटंचाई निर्माण झाली असून, भविष्यातील चित्र अधिक भीषण असेल.