
India economic crisis
esakal
दिनेश व्होरा
केंद्र सरकारकडून जीएसटीमध्ये सुधारणा केली असून, त्यातून सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे. मात्र, देशातील सामान्य नागरिकांसमोर रोजगाराचे मोठे संकट आहे, सामान्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. महागाई वाढतच आहे. तरीही सरकारकडून अर्थव्यवस्थेचे आभासी चित्र निर्माण करण्यात येत आहे, ही शोकांतिका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर, जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता २२ सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू झाले आहेत. प्राप्तिकर आणि जीएसटीतील सुधारणांतून सामान्य नागरिकांना अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात आल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना या सवलतींचा फायदा होणार असून, नागरिकांनी बचत उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, या कर सुधारणांचा फायदा देशांतर्गत बाजारपेठेला होणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. वास्तवात, ही परिस्थिती अशी आहे का? सरकारने हा निर्णय आताच का घेतला, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.