
Indian students in USA
esakal
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ‘एच-वन बी’ व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करून ते थेट एक लाख डॉलरवर नेले. त्याचा जबर फटका अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना बसू शकतो. ‘जागतिक नेतृत्वा’चा किताब जर अमेरिकेला कायम टिकवायचा असेल तर त्यांना नव्याने समतोल साधण्याचा विचार करावा लागेल... अन्यथा भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मुकावे लागेल.
अमेरिकेला स्वप्नांचा देश म्हटले जाते. कितीतरी जण ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झगडत राहतात. या स्वप्ननगरीमध्ये शिक्षण घेणे किंवा नोकरी करणे हे असंख्य भारतीय तरुणांचे कैक वर्षांपासूनचे स्वप्न राहिले आहे. भारतातील बुद्धिमान तरुणांना खरा वाव कुठे मिळत असेल तर तो अमेरिकतच, हे अनेकांच्या डोक्यात अगदी पक्के बसले आहे. गेली अनेक दशके प्रचंड हुशार, कुशाग्र बुद्धिमत्तेची तरुणाई अमेरिकेतील विविध विद्यापीठे आणि कंपन्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली, बायोटेक लॅब्स आणि संशोधन केंद्रांमध्येही भारतीयांची संख्या मोठी आहे.
अमेरिकेनेही इतकी वर्षे अगदी मोकळ्या मनाने त्यांचे स्वागतच केले आहे... आता मात्र अमेरिकेला जाण्याची किंवा तिथे ‘एच-वन बी’ व्हिसावर असलेल्या अनेकांची स्वप्ने अपूर्ण राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारण आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले निर्बंध. ‘मेक अमेरिका, ग्रेट अगेन’ असा नारा जरी ट्रम्प यांनी दिला असला तरी या निर्बंधांमुळे अमेरिकेचेच नुकसान होणार का, अशी चर्चा खुद्द अमेरिकेतच सुरू झाली आहे. या नव्या धोरणामुळे कदाचित नोकरीसाठी होणाऱ्या स्थलांतराचे स्वरूपही बदलले जाऊ शकते.