
पूर्वी ध्वजारोहणाला न येणारे लोक आता पहाटेच मैदानावर येतात. सर्वात मोठा बदल म्हणजे, राष्ट्रीय सण हा केवळ शाळा किंवा सरकारी कार्यालयापुरता मर्यादित न राहता, गावाचा सामूहिक उत्सव बनलाय...
‘कुठल्याही कामाची सुरुवात आपल्या स्वतःपासून करायला हवी, तरच तो संकल्प खराखुरा पूर्ण होतो.’ ही गोष्ट आमच्या मनात अगदी पक्की आहे. कारण आम्ही पाहिलंय, देशप्रेमाच्या, देशभक्तीच्या गोष्टी करणारे लोक बरेच असतात. भाषणं, घोषणा, फोटो... सगळं असतं; पण जेव्हा खरं काम करण्याची वेळ येते तेव्हा हात पुढे करणारे फारच थोडे असतात.
आज देशभरात ‘घरघर तिरंगा’ मोहीम जोमात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला देशव्यापी रूप दिलंय, हे पाहून मला आणि माझ्या गावाला खूपच अभिमान वाटतो. कारण या मोहिमेचं बीज आपल्या छोट्याशा बेलोरा गावात रोवलं गेलं होतं, तेही अकरा वर्षांपूर्वी. तेव्हा ही कल्पना फक्त आपल्या गावापुरती होती. हळूहळू तालुका, जिल्हा, राज्य अशा पायऱ्या चढत ती देशभर पोहोचली आणि आज भारताच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक घरात तिरंगा फडकतोय.