
Haripal Kaushik
esakal
काही युद्धकथा या रणांगणात झालेल्या दारुण पराभवाच्या असतात. मात्र, खरा सैनिक त्यामुळे न थांबता आशेचा किरण शोधत धैर्याने आपली वाटचाल सुरूच ठेवतो आणि विजय मिळवतो - कधी स्वत:वर, तर कधी परिस्थितीवर! असाच एक सच्चा सैनिक म्हणजेच कर्नल हरिपाल कौशिक. सैन्याची वर्दी आणि मैदानी खेळ यांचं नातं फार घट्ट आहे! खेळतांना पडणं, पुन्हा उठणं... संघबांधणी करणं, एकदिलाने विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं... हे दोन्हीकडे अगदी सारखंच! दोन्ही ठिकाणी ध्येय एकच - विश्वाच्या पटलावर भारताचा ध्वज सर्वांत उंच ठिकाणी फडकत ठेवणं! मात्र, रणांगणावर लढताना परत उठण्याची संधी मिळेलच असं नाही हा मोठा फरक! तरीही सैनिक रणांगणावर लढतो तो त्याच खेळाडू वृत्तीने. या दोन्ही क्षेत्रांमध्ये कर्नल हरिपाल कौशिक यांनी बाजी मारली. त्यांचा प्रवास जेवढा हॉकीच्या चित्तथरारक सामन्यांचा, तेवढाच १९६२ च्या युद्धातल्या भीषण घटनांचा! मुख्य म्हणजे निराशेवर मात करत हा सैनिक अफाट मनोबलाच्या जोरावर ज्या पद्धतीने पुन्हा उभा राहिला, ते प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.