Himalayan Landslide
esakal
उमेश झिरपे
हिमालयाकडे पाहताना आपल्याला सर्वप्रथम जाणवते ती त्याची भव्यता. आकाशाला स्पर्श करणारी शिखरे, त्यांच्या कुशीत विसावलेल्या हिमनद्या, खोल दऱ्यांमधून धावणाऱ्या नद्या आणि हजारो वर्षांच्या भूगर्भीय इतिहासाचे साक्षीदार असलेले पर्वत. हिमालय म्हणजे स्थैर्याची प्रतिमाच, अशी आपली कल्पना असते. माणसाच्या एका आयुष्याच्या तुलनेत हिमालयाचा काळ इतका विशाल आहे की त्याच्याकडे पाहताना ‘बदल’ हा शब्दही क्षुल्लक वाटावा. पण गेल्या काही वर्षांत हिमालयाबद्दलची ही कल्पना बदलत आहे. पर्वत आजही तितकेच भव्य आहेत; मात्र त्यांच्यातील बदल अधिक वेगाने आणि स्पष्ट दिसू लागले आहेत. हिमनद्या मागे सरकत आहेत, पावसाचे स्वरूप बदलत आहे, पर्वतांचे उतार अस्थिर होत आहेत आणि नद्या अधिक अनिश्चित होत आहेत. हिमालयाच्या अंतर्भागात आणि पृष्ठभागावर बदलांची एक प्रक्रिया सतत सुरू आहे. आजचा हिमालय समजून घेण्यासाठी कदाचित आपल्याला त्याच्याकडे केवळ निसर्गाच्या सौंदर्याच्या दृष्टीने नव्हे, तर एका बदलत्या आणि अत्यंत संवेदनशील परिसंस्थेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
२६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात घडलेल्या भीषण आपत्तीने याच वास्तवाकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले. सुरुवातीला ही घटना भूकंपामुळे घडली असावी, अशी शक्यता व्यक्त झाली. मात्र पुढील उपग्रह प्रतिमा आणि वैज्ञानिक विश्लेषणातून या घटनेचे चित्र अधिक स्पष्ट होत गेले. उंच पर्वतीय भागात, सुमारे ५,२०० मीटर उंचीवर, हिमनदीचा मोठा भाग आणि त्याखालील खडकांचा काही भाग तुटून खाली कोसळला, असे प्राथमिक विश्लेषणातून दिसते. हा केवळ बर्फाचा तुकडा तुटण्याचा प्रसंग नव्हता. प्रचंड प्रमाणातील बर्फ, खडक आणि इतर अवशेष वेगाने खालील दरीत कोसळले आणि त्यातून एक हिम-पाषाण कडा कोसळण्याची घटना घडली. या प्रचंड प्रपातामुळे निर्माण झालेली ऊर्जा इतकी मोठी होती की सुरुवातीला नोंदवलेला भूकंपाचा संदेश पर्वत कोसळण्याचाच परिणाम असू शकतो, असे अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या विश्लेषणाने स्पष्ट केले.