नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर महापालिकेने अवलंबलेल्या ‘प्रोजेक्ट वॉर’ या १०० दिवसांच्या विशेष सुधारणा मोहिमेने अवघ्या तीन महिन्यांत महापालिकेचे कामकाज आणि प्रतिमेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेने कर्मचारी शिस्त, तंत्रज्ञानाचा वापर, कार्यालयीन सुविधा व जनसहभाग या सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय प्रगती साधली आहे. परिणामस्वरूप, या मूल्यांकनात २९ महापालिकांमध्ये उल्हासनगर अव्वल क्रमांकाने पुढे आली.
या मूल्यमापनामध्ये प्रशासनाने केलेल्या सुधारणा निम्न दहा निकषांवर तपासल्या गेल्या होत्या – वेबसाइट आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण प्रणाली, नागरिकांचा वापर सुलभता, गुंतवणुकीला अनुकूल वातावरण, स्वच्छता व पर्यावरण, आर्थिक शिस्त, नवप्रवर्तने, सार्वजनिक सहभाग आणि विशेष उपक्रम राबविणे.
उल्हासनगर महापालिकेने या प्रत्येक निकषावर उत्कृष्ट कामगिरी दर्शवली. संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन व्यवस्थापन, तक्रारींचे तत्पर निवारण, नवीन तांत्रिक प्रणालींचा अवलंब या बाबतीत मिळालेला उच्च गुण गुणवत्ता परिषदेने अधोरेखित केला. प्रोजेक्ट वॉर अंतर्गत राबवलेल्या या सर्व सुधारणांचे फलित अखेरीस राज्य पातळीवरील मूल्यमापनात झळाळून उठले.