
नीलिमकुमार खैरे
पस्तिसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा सर्पोद्यानात काम करण्याबरोबरच मी प्राण्यांचं अनाथालयही सुरू केलं होतं. तिथे आम्ही जखमी प्राण्यांवर उपचार करायचो आणि ते प्राणी बरे झाल्यावर वनखात्याच्या परवानगीनं त्यांना ताम्हिणी, लोणावळ्याच्या जंगलांत सोडायचो. एकदा असंच काही प्राण्यांना लोणावळ्याच्या जंगलात सोडून आलो. दोनेक दिवसांनंतर तिथल्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा फोन आला.
त्यांना एक जखमी हरिण सापडलं होतं. ते त्या हरणाला घेऊन येत होते. आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत हरणानं जीव सोडला होता. पोस्टमार्टम करताना त्याच्या पोटात वेफर्सची तीन-चार पाकिटं सापडली. त्याच्या मृत्यूमागचं कारण वेगळं असलं, तरी त्या प्लॅस्टिकमुळे आम्हाला चिंता वाटली. क्षाराच्या शोधात असणाऱ्या त्या हरणासारख्या इतरही अनेक प्राण्यांना अशी सॉल्टी स्नॅक्सची पाकिटं सहजी सापडायची आणि ते प्राणी ती पाकिटं खायचे. जठरात प्लॅस्टिकचा कचरा अडकल्यामुळे अशा किती प्राण्यांना प्राण गमवावे लागले असतील या कल्पनेनं आपण कुठेतरी कमी पडतोय याची प्रकर्षानं जाणीव झाली.