

Asha Bhosle Life Story
esakal
सगळ्या बहिणी आणि आईपेक्षाही आशाताई सशक्त आणि मजबूत होती. निरोगी मजबूत शरीर आणि दिसायला सुंदर, बाबांसारखी. त्यांच्यासारखेच धारदार नाक, जाड ओठ, मधोमध रेघ असलेले. लांबट निमुळती हनुवटी आणि टोकाला खळ. गालावरती बोलताना, हसताना पडणाऱ्या अतिशय मोहक खळ्या. आणि डोळे? निष्पाप, गरीब, अगदी वनवासी सीतेसारखे...आशाताईच्या आठवणींचा हा हृद्यपट...
हब म्हणजे म्हैस. गावाकडे बैल ज्यावेळी काम करीत नाही, त्या वेळी शेतकरी हू र र ऽऽऽऽ हू ऽऽऽऽ अशी हाळी देतात. मांजरीला म्या ऽऽऽ व, कुत्राला छू ऽऽऽऽ तसेच म्हैस अडून बसते, चालतच नाही, त्या वेळी गवळी ह ऽऽ ब ऽऽऽ हब म्हणतो. बाबा (मा. दीनानाथ) आशाताईला हबऽऽ म्हणायचे. आई चिडून म्हणायची, ‘‘पाच मुलांत सगळ्यांत सशक्त, बांधेसूद, सुंदर आशा आणि तुम्ही तिला ह ऽऽ ब म्हणजे म्हैस का म्हणता?’’
बाबा हसायचे. पण त्या हसण्याला खिन्नतेची झालर असायची. एक पक्का विचार, अभ्यास असायचा. मग म्हणायचे. ‘‘श्रीमती! अगं मेष रास, मेष लग्न, सप्तमेश शुक्र, कलेचा संसाराचा स्वामी हे या पोरीच्या कुंडलीत पडले आहेत. कर्तबदार, धीट, धाडसी, मनस्वी, उत्कृष्ट गायिका, दिसायला सुंदर आणि भाग्यवान, श्रीमंत पण उपभोगशून्य आणि स्वभाव भोळा. कोणावरही विश्वास ठेवणारा, विश्वासघात करणाऱ्यावरही माया करणारा आणि मुख्य विश्वासघातकी, कृतघ्न लोकांचा गराडा हिच्या भोवती असणार. सर्व सुखं दारी हात जोडून उभी असतानाही. मनात एक अपूर्णतेची सल लसलसणारा. म्हशीसारखी निरूपद्रवी, पण भोळी आणि कुणी अंगावर आलं, तर सरळ शिंगावर घेऊन फेकून देणारी. श्रीमती! मला हिची फार काळजी वाटते. सगळी सुख असतानाही ही सुखाला पारखी असणार. पंचपक्वानांनी सजलेलं ताट असतानाही हिची भूक आधीच मेलेली असणार.’’ आई खूप चिडायची, म्हणायची. ‘‘शुभ बोला, खड्यात पडो तुमचा तो ज्योतिष अभ्यास. माझ्या भोळ्या आशाबद्दल कीती वाईट भविष्य करता?’’ बाबा हसायचे. मंगेश, मंगेश पुटपुटायचे. आमच्या पुण्याच्या घराला गच्ची होती. संध्याकाळी या चार बहिणी तेथे खूप खेळायच्या, खेळ म्हणजे आटापट्या, हुतूतू, सईबाईचा कोंबडा, झिमपोरी झिम् ऽऽऽ साऱ्या सुरात गायच्या. पोटात कदान्न, पण गळ्यात पक्का स्वर, ताल आणि लय. मी लंगडा. पायात हाडेव्रणाचं दुःख, वेदना भरलेला. सतत ताप, मला आणि बहिणींना. या बहिणी मला गच्चीवर घेऊन जायच्या, दीदी (लता) मोठी, ती मला कडेवर घेऊन खेळायची. पण ती अशक्त, माझा भार तीला सोसायचा नाही. एक दिवस खेळताना तिचा तोल गेला. ती आणि मी पडणार, तेवढ्यात आशाताईने दीदीला आणि मला सावरले, अगदी लिलया, सहज.