

Hridaynath Mangeshkar story
esakal
कोळीजीवन पाहून ये, असे दीदींनी हृदयनाथांना सांगितल्यावर पंडितजी कोळीवाड्यात जाऊन आले. तिथले जीवन त्यांनी पाहिले. घरी आल्यावर तो अनुभव त्यांनी दीदींना सांगितला, दीदींनी त्यांना ज्ञानेश्वर, तुकाराम यांचे संदर्भ देऊन वडील काय म्हणत असत ते सांगितले. कलाकारांचा धर्म आणि वडिलांची शिकवण यांवर त्या खूप वेगळं बोलल्या. काय झाले होते, त्यांचे बोलणं, त्या वेळी. सांगत आहेत पंडितजी ते सारंकाही या भागात...
मी घरी आलो. दीदीच्या खोलीत गेलो,
दीदी केस विंचरत बसली होती.
कंटाळली होती. कारण दीदीचे केस फार
दाट आणि लांब चक्क पायापर्यंत लोळणारे.
ती वेणी घालायची, तेव्हा त्या वेण्या
घोट्यापर्यंत यायच्या. अंबाडा बांधला तर तो
मान वाकेल असा जड आणि मोठा व्हायचा.
‘‘दीदी ! मी आज वर्सोव्याला गेलो होतो.
कोळीवाडा पाहिला. कोळीजीवनाचे
बरेच अनुभव ऐकले. समुद्र आणि कोळी
यांचे विलक्षण नाते आहे. जो समुद्र त्यांना
जगवतो, तोच समुद्र त्यांचा कधी कधी
जीवही घेतो. जीवन आणि मृत्यू, धाडस आणि मौज,
जीवनानंदासाठी अटळ क्रौर्य. असा एक
विलक्षण खेळ नियतीने,
निसर्गाने यांच्यासाठी मांडला आहे.’’
दीदी अचंब्याने म्हणाली,
‘‘हृदय! जगण्याचा आनंद आणि क्रौर्य
असे तू म्हणालास, मला कळले नाही,
तुला काय म्हणायचे आहे ते.’’
मी थोडासा खिन्न झालो, म्हणालो.
‘‘दीदी ! मला कळत नाही, थोडे कळतेही.
पण वळत नाही. जगण्यासाठी, जीवनानंद,
सर्व सुखे, मौज, उपभोग, आनंदाने घेण्यासाठी,
मस्तीत जगण्यासाठी हे कोळी रोज सातत्याने
कोट्यवधी माशांचा जीव घेतात,
म्हणजे वध करतात. ते मासे जेव्हा पकडतात,
तेव्हा ‘आलो होतो काही श्वासांसाठी फक्त,’
त्या माशांचे हे हृदगत् कुणी ऐकतच नाही.