
Lata Mangeshkar
esakal
कुटुंबासाठी सतत झटणाऱ्या लतादीदी वडिलांचा अर्थातच पंडित दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा जपत होत्या. अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षा वेगळ्याच बाबींचा आग्रह त्या धरत होत्या. गाणं समजून घेऊन मग तू त्याला चाल लाव, असं त्या हृदयनाथांना समजावून सांगत होत्या. आपल्या भावंडांना त्यांनी किती आणि कशा प्रकारे मार्गदर्शन केलं हे सांगत आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर....
मी, आम्हा मंगेशकरांच्या गाण्याच्या खोलीत
बसलो होतो. खोली फार लहान आहे.
पाच ते सहा माणसे बैठक घालून बसू
शकतील, एखादे वाद्य घेऊन
बसून वाजवू शकतील एवढीच.
इतकी लहान का तर ते आधी स्वयंपाक घर होते.
आंग्ल पद्धतीचे. उभे राहून स्वयंपाक करण्याचे.
आपल्या मराठी स्वयंपाकासाठी
ते फार अडचणीचे वाटू लागले म्हणून दुसऱ्या
जागी स्वयंपाक घर केले आणि या छोट्या
खोलीत नको असलेले सामान भरण्यात सुरुवात
झाली. सहा महिन्यांत खोली सामानाने गच्च भरली.
कोणी तिकडे फिरकेना आणि सारेच
तिला अडगळीची खोली म्हणू लागले.