

Lata Mangeshkar
esakal
भालजी पेंढारकर यांनी लतादीदींच्या गाण्याचे कौतुक केल्यावर, या गाण्याचे संगीत कोण करणार, असे विचारल्यावर दीदींनी, बाळ याचे संगीत करेल, असे सांगून हृदयनाथांना काही सूचना केल्या. संगीतकार आनंदघन अर्थातच लतादीदी यांचे सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या हृदयनाथ यांनी त्या गाण्यासाठी पुढे काय काय केलं, याबद्दल ते स्वतःच सांगत आहेत, या भागात...
भालजी पेंढारकरांनी दीदीला विचारले,
‘‘या गाण्यामधल्या संगीताचे काय करायचे?
कुठली वाद्ये वापरायची?’’
दीदी काही बोलण्याआधीच मी भारावलेल्या
आवाजात म्हणालो.
‘‘या गाण्यात फक्त तालवाद्ये, तीही
छोटी आफ्रिकन, पण वेगवेगळ्या सुरात
लागणारी, थोडक्यात गावठी ‘तबलातरंग’
मग टिंगरी, जी गावामध्ये रस्त्यात वाजवत
विक्रेते फिरतात. एक धनगरी ढोल.
चिमटा आणि सुसंवादी अन् विसंवादी स्वरात
मिळविलेले हार्प (स्वर मंडळ)
बस् इतकीच वाद्ये या गाण्यात वाजवायची.’’
भालजी पेंढारकरांनी दीदीकडे पाहिले.
दीदी हसली, म्हणाली,
‘‘बाबा! बाळ माझा असिस्टंट, त्याला
या गाण्याचा, प्रसंगाचा, ग्रामीण जीवनाचा
अर्थ जाणवलाय. त्यानं निवडलेली वाद्ये,
मीही हीच वाद्ये निवडली असती.