
एक काळ असा होता, की पूर्ण पाच दिवस कसोटी क्रिकेट चालायचे. ते पाहण्याची सहनशीलता आणि तितका वेळही प्रेक्षकांकडे असायचा. आता एका क्लिकवर सर्व काही उपलब्ध करण्याची सवय जडलेल्या या युगात प्रेक्षकांकडे एवढा वेळ, कसोटीत खेळणाऱ्या खेळाडूंकडे तेवढा संयम आहे का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
सध्याचे युग ‘टू मिनिटस्’ अशा फास्ट फूडचे आहे, त्यामुळे जिभेच्या चोचल्यापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व काही झटपट आणि पटापट हवे. मग त्यासाठी काही पारंपरिक रचनेत बदल करावा लागला आणि भला मोठा इतिहास आणि संस्कृतीला छेद द्यावा लागला तरी हरकत नसते. क्रिकेट म्हटलं की आता ट्वेन्टी-२० आणि लीगचा थरार डोळ्यासमोर येत असला तरी पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट हेच मूळ क्रिकेट! पण आता पाच-पाच दिवस खेळण्यासाठी ऊर्जा आणि क्षमता खर्च करत राहावी का, असे अनेकांना वाटते. म्हणूनच वेस्ट इंडीजचा निकोलस पूरनसारखा हरहुन्नरी फलंदाज २९व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारतो. तोच नव्हे तर गेल्या काही महिन्यांत ग्लेन मॅक्सवेल, हेन्रिक क्लासेनसारखे नावाजलेले खेळाडू निवृत्त झाले आणि हो रोहित शर्मा, विराट कोहली यांनीही कसोटीला बाय बाय केलेले आहेच.