

ICICI Prudential Equity And Debt Fund
esakal
वसंत कुलकर्णी - vasant@vasantkulkarni.com
कोविड महासाथीनंतरच्या तेजीच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर नव्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांकडे धाव घेतली; मात्र बाजारातील तीव्र चढ-उतारांचा अनुभव नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी संतुलित गुंतवणूक अधिक महत्त्वाची ठरते. शेअर आणि रोखे यांचा योग्य मेळ साधत दीर्घकालीन भांडवलवाढीसोबत तुलनेने नियंत्रित जोखीम देणारा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंड हा अशा गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.
कोविड महासाथीनंतरच्या तेजीच्या बाजारामुळे अनेक नव्या गुंतवणूकदारांनी बाजार-संलग्न गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला. मात्र, या गुंतवणूकदारांनी बाजारातील मोठ्या चढ-उतारांचा पूर्ण अनुभव अद्याप घेतलेला नाही. अशा परिस्थितीत, शेअर आणि स्थिर-उत्पन्न पर्यायांचा संतुलित मेळ साधणारे हायब्रिड फंड नव्या गुंतवणूकदारांसाठी अधिक योग्य ठरू शकतात. अशाच फंडांपैकी एक म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंड.
हा फंड ‘अॅग्रेसिव्ह हायब्रीड फंड’ या गटात मोडतो. दीर्घकालीन भांडवलवाढ आणि नियमित उत्पन्न या दोन्ही उद्दिष्टांचा समतोल साधण्यासाठी हा फंड तयार करण्यात आला आहे. फंडाचा मानदंड क्रिसिल हायब्रीड ३५+६५ अॅग्रेसिव्ह इंडेक्स हा आहे. फंडातील साधारणपणे ६५ ते ८० टक्के गुंतवणूक शेअर आणि शेअर-संलग्न पर्यायांत, तर २० ते ३५ टक्के गुंतवणूक डेट आणि मनी मार्केट पर्यायांत केली जाते.
या फंडाचे व्यवस्थापन सात सदस्यीय चमू करत असून, शंकरन नरेन हे इक्विटी विभागाचे नेतृत्व करतात. त्यांच्यासोबत मनीष बांठिया, मित्तुल कलावडिया, अखिल कक्कर, श्री शर्मा, शर्मिला डी’सिल्वा आणि नित्या मिश्रा हे सदस्य आहेत.