Premium| High Gold Prices: लहान सराफा व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोन्याचे वाढते दर व कर अडचणीचे?

GST on gold and silver: सोने खरेदीसाठी अनेक लोक जीएसटी बिल नको म्हणून विनंती करतात. शासनाने 'जीएसटी' एक टक्क्यापर्यंत आणल्यास सर्व ग्राहक बिल घेऊन खरेदी करतील.
GST on gold and silver

GST on gold and silver

esakal

Updated on

स्वरूप लुंकड

वस्तू आणि सेवा करात नुकत्याच झालेल्या सुधारणेमध्ये (जीएसटी.२) सोने, चांदीवरील कर दरात केंद्र शासनाने कोणतीही कपात केली नाही. ३ टक्के ‘जीएसटी’ लावणे हा सोने, चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय आहे. इतर वस्तूंवरील ‘जीएसटी’ कपात केला तसा सोन्यावरील ‘जीएसटी’ १ टक्क्यांपर्यंत आणावयास हवा होता. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री कमी बसली असती. एकीकडे सोन्याचे भाव दररोज वाढत आहेत. दुसरीकडे ‘जीएसटी’ ३ टक्के आहे. याचा फटका ग्राहकांनाच बसत आहे.

भारतीय पंरपरेत कोणत्याही समाजात मुला-मुलीचे लग्न जमते तेव्हा मुलीला सोने दिले जाते. जर २० तोळे सोने मुलीला देऊ, असे सांगितले गेले असेल तेव्हा सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव होता एक लाख रुपये. हे लग्न ठरले दिवाळीपूर्वी, मात्र, प्रत्यक्षात लग्न आहे दिवाळीनंतर. आज सोन्याचे भाव आहेत एक लाख १५ हजार रुपये, दिवाळीपर्यंत ते भाव जातील १ लाख २५ हजारापर्यंत. लग्नापूर्वी वीस तोळे सोन्याच भाव वीस लाख होता. आता दिवाळीनंतर तो २५ लाखापर्यंत जाईल. पाच लाख रुपये लग्न जमविलेल्या मुलीच्या कुटुंबाला सोने खरेदीपोटी अधिक मोजावे लागतील.

क्रयशक्ती कमी होणार

युक्रेन-रशियाचे युद्ध सुरू झाले. तेव्हापासून सोन्यात भावात वाढच होत आहे. सोने गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. पाहिजे तेव्हा सोने मोडून पैसे हातात येतात. यामुळे या गुंतवणुकीत विश्वासार्हता आहे. ‘जीएसटी-२’मध्ये सोने, चांदीवरील ‘जीएसटी’त केंद्र शासनाने कपात केली नाही. ३ टक्के ‘जीएसटी’ ग्राहकहिताचा नाहीच. अन्य वस्तूंवरील ‘जीएसटी’ कपात केला तसा सोन्यावरील जीएसटी १ टक्क्यांपर्यंत आणून, ग्राहकांचा खर्च थोडा वाचविता आला असता. एकीकडे सोन्याचे भाव दररोज वाढत आहे. दुसरीकडे ‘जीएसटी -३’ टक्के आहे. याचा ग्राहकांना तोटा होत आहे. नाहक भुर्दंड पडत आहे. सोन्याचे वाढते भाव पाहता ‘जीएसटी’ एक टक्क्यांपर्यंत खाली आणावा. अन्यथा सोन्याच्या बाजारात सोने, चांदीचे ग्राहक कमी होतील. भाव वाढल्याने सोबत ‘जीएसटी’चा भार यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती कमी होणार आहे.

अतिरिक्त भारामुळे ताण

घडणावळीवर ५ टक्के ‘जीएसटी’ आहे. सोन्याचे भाव वाढलेले असताना त्यात घडणावळीवर ५ टक्के ‘जीएसटी’ भरावे लागत असल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. शासन एकीकडे म्हणते, की आम्ही ग्राहकांचा फायदा करून देतो, कमीत कमी कर बसावा असे सांगते. दुसरीकडे सोने-चांदीवरील ‘जीएसटी’ कमी करताना शासनाने डोळे बंद केले आहेत. सोन्या- चांदीवर किती ताण देतो आहेत, याची जाणीव त्यांना असायला हवी होती. गरीब कुटुंबाची सोने घेताना किती ओढाताण होते हे आम्ही पाहतो. ग्राहकांना वाटते व्यापारी आपल्याला ‘जीएसटी’तून लुटतो आहे. मात्र, व्यापारी हा ‘जीएसटी’ शासनाला भरतात. ‘जीएसटी’ कमी असला तर तो ‘जीएसटी’सह खरेदी करेल. काही ग्राहक असे असतात, की ते म्हणतात, आम्हाला तुमच्याकडून सोने घ्यायचे नाही. तुम्ही आमच्या नावाची ‘जीएसटी बिल’ देतात. माझ्याकडून ‘जीएसटी’ घ्या, मात्र माझ्या नावाचे बिल फाडू नका, असे सांगणारेही ग्राहक असतात. कारण मुळात सरकारचे धोरणच चुकीचे आहे. जो तो आपापल्या परीने चोरी न करता सोने घेतो. एक-दोन टक्के चोरी करीत असतील. मात्र ९८ लोक सरळमार्गाने सोने घेताहेत. दोन टक्के चोरी करणाऱ्या ग्राहकांमुळे ९८ टक्के लोकांवर ‘जीएसटी’च्या रूपाने शासन अन्याय करते आहे. मजुरी ५ टक्के आहे, ती एक टक्का झाली तर ग्राहकांना आनंद होईल.

२५ वर्षांत ३० पट सोने दरवाढ

जन्मापासून मृत्यूपर्यंत सोने, चांदी लागते. जन्म झाल्यानंतर बाळाला सोने, चांदीची बाळी, कडे, सोनसाखळी दिली जाते. मृत्यूनंतर दान म्हणून सोने, चांदी दिली जाते. एवढे महत्त्व या वस्तूंना आहे. मणी मंगळसूत्र म्हणून महिला सोने घेतात. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. बॅंकेत गेले तर त्यांच्या वेळेनुसार बँकेत जा. बँकेत पैसा ठेवला तर, प्राप्तिकर खात्याची या खात्यात एवढा पैसा कोठून आला यावर नजर असते. सोन्याचे तसे नसते. गरज पडेल तेव्हा सोने विकून पैसे घेऊन संबंधितांना आपल्या कामासाठी वापरता येतात. १० ग्रॅम सोन्याचा २००० मधील भाव होता चार हजार रुपये. २५ वर्षांत सध्या हा भाव आहे एक लाख १५ हजार रुपये. २००० मध्ये एक टक्के विक्रीकर लागत होता. २५ वर्षांत हा करही वाढला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल अशी ही कररचना आहे. ‘जीएसटी’ आल्यापासून एक टक्के विक्रीकर होता. आता तीन टक्के ‘जीएसटी’ भरावा लागतो. सोन्याच्या भावातील जागतिक बाजाराची वाढ पाहता, ‘जीएसटी’ एक टक्क्यांपर्यत आणला पाहिजे होता. सोने-चांदीची दरवाढ पाहता ‘जीएसटी’ माफही करायला हवा होता. जागतिक स्तरावर जे दर २५ वर्षांत चार हजारांपासून एक लाख १५ हजारापर्यंत भाववाढ झाली आहे. ही वाढ तीस पटीने झाली आहे.

पूर्वी व्यापारी शंभर ते दीडशे किलो सोने एका वेळी घेत होते. आता भावात झालेली वाढ पाहता व्यापारी ६०-७० किलो सोने विक्रीसाठी घेतो. मंदी दिसत नाही. अतिशय जोरात सोने खरेदी वाढते आहे. वाढलेली मागणी पाहता सोन्याचे दर भविष्यात दोन ते पाच वर्षांच्या काळात दोन लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. भाव कमी झाले तरी दोन-पाच हजारांनी कमी होतील. सोन्याचे दर कमी झाल्याचा दिलासा मिळेपर्यंत ते भाव सात ते दहा हजारांनी वाढतच राहील.

सोने खरेदी कमी झाली

या दरवाढीचा परिणाम सोने, चांदीवर दिसून येत आहे. सराफ बाजारात, दुकानात ग्राहक येत नसल्याचे चित्र आहे. दिवसभरात चार-पाच ग्राहक येतात, अशी स्थिती आहे. हा परिणाम भाववाढीचा आहे. ग्राहक, सोने कारागीर, व्यापारी यांच्या वेदना मी जवळून रोज पाहतो आहे. पूर्वी चांदीचा भाव ६ हजार होता. तेव्हा एका दुकानात चार व्यापारी रांगेत बसून खूप ‘स्टॉक’ दाखवायचे. ग्राहकांना त्यावेळी चांदी खरेदी करण्यासाठी वाट पहावी लागत असे. आता मागील १०-१५ वर्षांत प्रदर्शन भरविण्याची प्रथा सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांना असे जागतिक सोने, चांदीचे प्रदर्शन दाखविण्याची वेळ आली आहे. दरवाढीचे प्रमाण खूप मोठे दिसत आहे. मात्र, सोने खरेदी कमी होते आहे. सोने बँका खरेदी करत आहेत ते सुरक्षितता म्हणून. रिझर्व्ह बँक, कंपन्या गुंतवणूक म्हणून करून ठेवत आहेत. सरकार एवढेच पाहते, की सोने जास्त विकले जात आहे. मात्र, बँका ते गुंतवणूक म्हणून घेत आहेत. सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर होते. सोने ४ हजार होते, नंतर सहा, दहा हजार झाले. आता एक लाख १५ हजार झाले. त्याच्या खरेदीचे प्रमाणही वाढत होते. मात्र, आताच्या भाववाढीने खरेदीतील वाढ पाहणे दुर्मिळ होईल. आता ज्या पटीने सोने दर वाढले आहेत, ते भविष्यात फक्त दुप्पट, अडीच पट होईल. दोनशे टक्के, पाचशे टक्के वाढ आता दुर्मिळ होत जाणार आहे.

सर्वसामान्यांची अडचण

सामान्य ग्राहक, कारागीर, दुकानदारांवर याचा परिणाम होईल. मोठ्या दुकानदारांना १० टक्के फरक पडतो. लहान दुकानदारांना ५० टक्के फरक पडलेला आहे. ते कर्जबाजारी होत आहेत. दिवसेंदिवस भाववाढ होते आहे, सोन्याची विक्री कमी होत आहे. ‘हॉलमार्क’ आले ते लहान दुकानदारांना समजलेले नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी ‘हॉलमार्क’ सुविधा आहे. ती सुविधा तालुका, गावपातळीवर दिली पाहिजे. जेणे करून काहींना रोजगार मिळेल. यंत्रणा शासनाने ही सुविधा दिली पाहिजे. सर्व कर व्यापाऱ्यांनीच भरायचा, असे शासनाने ठरविले आहे. कराचा, ‘जीएसटी’चा बोजा व्यापाऱ्यांवर आहे. तीस टक्के प्राप्तिकर कोणत्या रूपाने घेतात. शंभर रुपये मी कमवितो ३० रुपये कर भरावा लागतो. सर्वसामान्यांसाठी सरकार आहे ना मग ‘जीएसटी’चे दर एक टक्क्यांवर आणा. विविध कर भरावे लागते. ते एकाच रुपात करा. सोन्या-चांदीतील ‘जीएसटी’ कमी झाला तर सर्व जण बिले घेऊन सोने खरेदी करतील. त्यामुळे दुरावत चाललेला सर्वसामान्य ग्राहक सोने खरेदीकडे वळेल, असा विश्वास वाटतो.

(शब्दांकन - देविदास वाणी, जळगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com