
वेब-सीरिज आणि चित्रपटांचे वेड असलेले सगळेच आजकाल मोबाईलवर आणि स्मार्ट टीव्हीवर एकामागून एक भन्नाट हिंदी वेब-सीरिज बघत असतात. 'मिर्झापूर' असो, 'गुल्लक’ असो किंवा 'फॅमिली मॅन'. आपण सगळेच या कथाविश्वात अगदी हरवून जातो. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? यापैकी बहुतेक कथा 'मुंबई'च्या गजबजलेल्या रस्त्यांवर किंवा 'दिल्ली'च्या पॉश एरियामध्येच घडताना दिसतात. म्हणजे, एसी ऑफिस, पॉश फ्लॅट्स, रात्रीचे नाईट क्लब, मेट्रो ट्रेनची धावपळ... हीच आपली पडद्यावरची रोजची दुनिया होऊन बसलीये, नाही का?
पण त्याच्यावर प्रतिउत्तर म्हणून Ormax Media ने नुकताच एक रिपोर्ट प्रदर्शित केलाय. ते म्हणतात की, ही चकाचक मेट्रो शहरे सोडाच, आपल्या निमशहरी आणि ग्रामीण भागातील कथा प्रेक्षकांच्या मनाला तुलनेने जास्त भिडतायत आणि त्यांना खऱ्या अर्थाने भावतात सुद्धा! यालाच त्यांनी 'मेट्रो मायोपिया' असं नाव दिलंय. याचा अर्थ असा की, मोठे शहरं आणि तिथल्या जीवनाच्या प्रेमात आपण इतके बुडून गेलोय की, बाकीच्या भारताचं महत्त्वच आपल्या लक्षात येत नाहीये!