

Leopard Attacks Maharashtra
eSakal
नागपूरच्या गुलाबी थंडीतील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘बिबट्या’ या विषयाने वातावरण पेटले होते. सभागृहात बिबट्याची चर्चा रंगलेली असताना नागपूरच्या एका भागात बिबट्या थेट लोकवस्तीत घुसल्याने धांदल उडाली होती. बिबट्याच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या जवळपास ६० आमदारांनी सभागृहात आक्रमक भूमिका मांडली आहे. मात्र, या चर्चेत सदस्यांनी मांडलेल्या भन्नाट उपाययोजनांनी करमणूकच जास्त झाली. या प्रश्नाला वेळीच ठोस उत्तर शोधले नाही तर बिबट्याचा ‘कोरोना’ झाल्याशिवाय राहणार नाहीत.
राज्याच्या अनेक भागांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याची समस्या गंभीर असलेल्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील बिबट्यांचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या गावांत प्रचंड दहशत आहे. त्यामुळे, ‘सातच्या आत घरात’ हा नियम कोणत्याही सक्तीशिवाय पाळला जात आहे. केवळ गोठ्यांचेच नाहीतर घरांचेही पिंजरे झाले आहेत. आता बिबट्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. निवडणुकीच्या काळात ‘रात्र वैऱ्याची’ म्हणून छुपा प्रचार रंगात यायचा. मात्र, नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी ‘वैऱ्याची रात्र’ही घरातच घालवली. बिबट्याच्या भीतीमुळे ‘कोरोना’च्या काळाप्रमाणे या गावांमध्ये ‘लॉकडाऊन’ लावण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.