

India five layer AI strategy Ashwini Vaishnaw Davos World Economic Forum
sakal
डॉ. योगेश हरिभाऊ कुलकर्णी
जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस येथील परिषदेत भारताचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक ठाम आणि अनेकांना आश्चर्यचकित करणारे विधान केले. काही तज्ज्ञ भारताला एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दुसऱ्या पंक्तीतील देश मानत असताना, वैष्णव यांनी भारत हा पहिल्या पंक्तीतील देशांमध्ये मोडतो, असा ठाम दावा केला. हा दावा फक्त आत्मविश्वासातून केलेला नाही, तर एआय हे भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा मोठा परिणाम करणार आहे, याची स्पष्ट आणि खोल समज त्यामागे आहे, असे दिसून येते.
भारताचा कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाच स्तरांच्या (फाइव्ह-लेयर) रचनेवर आधारित आहे. वैष्णव याला ‘एआय आर्किटेक्चर’ असे म्हणतात. हे एखादे घर बांधण्यासारखे आहे. घरासाठी भक्कम पाया, मजबूत भिंती, वीज-पाणी यांसारख्या सुविधा आणि वापरण्यायोग्य खोल्या आवश्यक असतात. त्याचप्रमाणे, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीही पाच महत्त्वाचे स्तर एकत्र काम करणे गरजेचे आहे. भारत या सर्व स्तरांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करत आहे, हीच या धोरणाची खरी ताकद आहे.