
अंतराळ हे इतिहासात नेहमीच जागतिक शक्ती आणि वर्चस्वाच्या प्रदर्शनाचे स्थान राहिले आहे. जगभरातील राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमांचा विस्तार मागील ८० वर्षांतील महत्त्वपूर्ण भू-राजकीय घडामोडींनी व्यापलेला आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने रॉकेट प्रोपलशन तंत्रज्ञानात प्रगती साधली आणि ‘व्ही-२’ या जगातील पहिल्या बॅलेस्टिक रॉकेटने लंडनसारख्या ठिकाणी मोठी हानी करून अवकाशासंबंधी कौशल्याचे लष्करी महत्त्व अधोरेखित केले. जर्मनीच्या पराभवानंतर ‘व्ही-२’वर काम केलेल्या जर्मन शास्त्रज्ञांना अमेरिका आणि सोव्हिएत संघ गुप्तपणे आपल्या देशात घेऊन गेले आणि या दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या अण्वस्त्रधारी शीतयुद्धाच्या छायेत प्रामुख्याने लष्करी उद्देशांसाठी आपापल्या देशातील अंतराळ कार्यक्रम चालवण्यासाठी या शास्त्रज्ञांना नियुक्त केले.
सोव्हिएत संघाने १९५७मध्ये ‘स्पुटनिक’ हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केल्यावर अमेरिकेला धडकी भरली. एक रेडिओ संदेश पाठवण्यापलीकडे काहीही करू न शकणाऱ्या या कृत्रिम उपग्रहाला अमेरिकेच्या भूभागावरून विनाअडथळा जाताना बघून उद्या या उपग्रहाच्या जागी एखादे आण्विक शस्त्र देखील सोव्हिएत संघ पाठवू शकतो, हे लक्षात आल्याने अमेरिकन नागरिक चिंतेत पडले. ही घटना या दोन्ही राष्ट्रांमध्ये ‘स्पेस रेस’ची नांदी ठरली. १९६०च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत अवकाश तंत्रज्ञानातील सोव्हिएत संघाची आघाडी हा निवडणुकीचा एक प्रमुख मुद्दा बनला आणि या विषयावरून जोरदार टीका करणारे जॉन एफ केनेडी अध्यक्ष बनले. १९६१मध्ये केनेडींनी एक ऐतिहासिक घोषणा केली, की अमेरिका पुढील दशकात एका अमेरिकन नागरिकाला चंद्रावर उतरवेल. स्पेस रेसच्या निकडीमुळे (आणि सामूहिक चिकाटीमुळे) अमेरिकेने हे ध्येय ९ वर्षांतच गाठले. या दरम्यान, सोव्हिएत संघाने चंद्रावर उतरण्याची आपली योजना रद्द केली, पण शीतयुद्धातील हे दोन्ही प्रतिस्पर्धी देश अणुयुद्धासाठी तयार