

India Belarus Relations
esakal
अलेक्झांडर मात्सुकोव - mumbai@mfa.gov.by
युरोपच्या केंद्रस्थानी असलेला बेलारूस आणि जागतिक पटलावर उदयोन्मुख महासत्ता म्हणून झपाट्याने पुढे येणारा भारत यांच्यातील व्यापारी संबंध केवळ द्विपक्षीय देवाणघेवाणीपुरते मर्यादित नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारण, युरेशियातील सुरक्षा, व्यापारमार्गांचे सक्षमीकरण आणि बहुपक्षीय संस्थांमधील सहकार्य या दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरतात. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील सहकार्य, आर्थिक व औद्योगिक क्षेत्रांतील भागीदारी, चित्रपट, संस्कृती, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रांतील देवाणघेवाण अन् मुंबईसारख्या आर्थिक केंद्राशी जोडलेली प्रादेशिक मुत्सद्देगिरी यांमुळे भारत-बेलारूस संबंधांना नवी दिशा मिळाली आहे.
जागतिक व्यवस्थेची समीकरणे वेगाने बदलत आहेत. शीतयुद्धोत्तर काळातील एकध्रुवीय जगव्यवस्था आता बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहे. विविध राष्ट्रांमधील पारंपरिक संबंधांचीही फेरमांडणी होत आहे. या बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत भारत अन् बेलारूस यांच्यातील संबंधांना नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. १७ एप्रिल १९९२ रोजी दोन्ही देशांमध्ये औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर सामायिक हितसंबंध, बहुपक्षीय व्यासपीठांवरील समन्वय आणि आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंधांचा विस्तार झाला आहे. रसायने व पेट्रोकेमिकल्स, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, औषधनिर्मिती आणि मत्स्य व सागरी खाद्यपदार्थांच्या क्षेत्रांतही सहकार्य वाढवण्याच्या संधी आहेत.
भारत आणि बेलारूस यांच्यातील मैत्रीचे बंध सोव्हिएत युनियनच्या काळापासून जोडलेले आहेत. बेलारूसला औपचारिक स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच, मे १९८५ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कुटुंबीयांसह मिन्स्क शहराला भेट दिली होती. त्या ऐतिहासिक भेटीने दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि प्रादेशिक सहकार्याला चालना मिळाली. १७ एप्रिल १९९२ रोजी भारत आणि बेलारूस यांच्यात औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर नवी दिल्ली आणि मिन्स्कमध्ये दोन्ही देशांचे दूतावास कार्यरत झाले. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील प्रादेशिक व्यापार आणि लोकसंपर्क वाढवण्यासाठी बेलारूसने धोरणात्मक पावले उचलली आहेत.
कोलकातामध्ये २००२पासून बेलारूसचे मानद वाणिज्य दूतावास कार्यरत आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २०२१ च्या शेवटी बेलारूसचे महावाणिज्य दूतावास सुरू झाले. त्यामुळे विशेषतः महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांना मोठी बळकटी मिळाली.