

India Brazil relations
esakal
आयातशुल्काबाबतच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे जागतिक व्यापार-उद्योगजगतात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यात आता युद्धाची भर पडली आहे. अशा स्थितीत भारताच्या विविध देशांबरोबर असलेल्या संबंधांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलबरोबरच्या भारताच्या संबंधांविषयी ‘इंडो-ब्राझील चेंबर ऑफ कॅामर्स’चे संचालक डॉ. नरेंद्र पाटील यांच्याशी गणाधीश प्रभुदेसाई यांनी केलेली बातचीत.
प्रश्न : ‘इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्स’चे संचालक म्हणून जबाबदारी आल्यापासून महत्त्वाच्या घडामोडींबाबत काय सांगाल?
उत्तर : मी जी२० परिषदेत भाग घेण्यासाठी २०२४मध्ये ब्राझील येथे गेलो होतो. त्या वेळी ‘इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या सदस्यांशी ओळख झाली. त्यांच्याशी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि त्यातून पुढे संबंध वाढत गेले. मागील एक ते दीड वर्षात ब्राझीलमधील चार राज्यांतील प्रमुख व प्रतिनिधीमंडळे भारतात येऊन गेली आहेत. भारतामधून दोन वेळा व्यावसायिक प्रतिनिधींनी ब्राझीलला भेट दिली. भारतीय व्यावसायिकांनी शैक्षणिक, फार्मा, माहिती-तंत्रज्ञान, बायोमायनिंग क्षेत्रात करार केले आहेत. ब्राझीलमधील विविध राज्य सरकारांच्या नेतृत्वाखाली आलेल्या प्रतिनिधी मंडळांनी भारतात विशेष करून महाराष्ट्रात संरक्षण, माहिती-तंत्रज्ञान, बायोटेक, कृषी उत्पन्न, मालाची साठवण यात गुंतवणुकीसाठी करार केले आहेत.