

India vs China Economic Growth
esakal
मुकुंद बी. अभ्यंकर - mbabhyankar@gmail.com
ससा आणि कासवाची शर्यत आठवतेय? शर्यत सुरू होताच ससा सुसाट सुटतो आणि कासव बिचारे आपल्या नेहमीच्या ‘कासवगतीने’ चालत राहते. सशाला खात्री असते,
‘‘ही शर्यत तर माझ्या खिशातच आहे!’’ म्हणून तो मध्येच झाडाखाली निवांत पहुडतो. कासव ना गाजावाजा करते, ना आपल्या प्रगतीचे फोटो टाकते; ते फक्त चालत राहते आणि गोष्टीच्या शेवटी कासव जिंकते! भारत आणि चीनच्या आर्थिक प्रवासाची तुलना करताना ही गोष्ट आठवणे तसे साहजिकच. ढोबळमानाने पाहता या गोष्टीतील दोन पात्रे या दोन देशांचे प्रतिनिधित्व करतात की काय, असे वाटू शकते. भारत आणि चीन यांच्या आर्थिक प्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत...
एकेकाळी भारताप्रमाणेच गरिबी आणि राजकीय उलथापालथीने ग्रासलेला चीन अचानक अमेरिकेच्या बरोबरीने उभा राहणारा ‘आर्थिक व औद्योगिक महासत्ता’ कसा बनला? आणि दुसरीकडे, प्रचंड मानवी भांडवल, लोकशाही आणि जागतिक प्रतिभा असलेला भारत आजही स्वतःच्याच उपखंडात स्वतःला एक स्थिर ‘प्रादेशिक शक्ती’ म्हणून सिद्ध करण्यासाठी संघर्ष का करत आहे? यातही दुसरी उल्लेखनीय बाब म्हणजे साधारण १९८८च्या आसपास दोन्ही देश आर्थिकदृष्ट्या तुलनेने समान पातळीवर होते आणि त्यानंतरची या दोन देशांची आर्थिक प्रगतीची यात्रा मात्र जवळपास त्या गोष्टीतील पात्रांसारखीच वाटावी अशी झाली. सुरुवातीला जवळजवळ एकाच रेषेवर उभे असलेले हे दोन देश आज आर्थिक आकारमान, औद्योगिक क्षमता आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत एकमेकांपासून कित्येक योजने दूर गेल्यासारखे भासतात आणि शर्यत चीननेच जिंकल्यासारखे सुकृतदर्शनी वाटू शकते.
महत्त्वाचा संदर्भबिंदू व आजची स्थिती
भारत आणि चीनचा एकत्रित विचार केला, की १९८८ हे वर्ष एक महत्त्वाचा संदर्भबिंदू म्हणून समोर येते. त्या सुमारास चीनचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सुमारे ३१३ अब्ज डॉलर आणि भारताचा सुमारे २९७ अब्ज डॉलर होते; दरडोई उत्पन्नात तर भारत चीनच्या पुढेच होता. १९८८ हे वर्ष हा संदर्भबिंदू मानला, तर त्यावेळी दोन्ही धावपटू एकाच रेषेवर उभे होते आणि थोड्याच वर्षांत एकाने दुसऱ्याला इतके मागे टाकले, की तो जवळपास दिसेनासाच झाला. म्हणजे असे की जागतिक बँकेच्या २०२४ च्या आकडेवारीनुसार, चीनचा ‘जीडीपी’ सुमारे १८.७४ ट्रिलियन डॉलर, तर भारताचा सुमारे ३.९१ ट्रिलियन डॉलर होता. दरडोई ‘जीडीपी’ चीनमध्ये सुमारे १३,३०३ डॉलर, तर भारतात सुमारे २६९५ डॉलर होता. केवढे हे दोन देशांच्या परिस्थितीतील अंतर! भारत आणि चीनच्या आर्थिक प्रगतीची तुलना म्हणजे त्या दोघांमधील शर्यत नाही.
दोन देशांमधील आर्थिक प्रगतीची तुलना ही १०० मीटरच्या शर्यतीसारखी करता येत नाही. धावण्याच्या शर्यतीला एक ठरावीक ट्रॅक आणि अंतिम रेषा असते. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमधील स्पर्धेला मात्र अंतिम रेषाच नसते. आजचा विकासाचा निकष उद्या बदलतो. त्यामुळे फक्त कोण, किती पुढे आहे, एवढे पाहण्यापेक्षा तो कोणत्या मार्गाने, कोणत्या साधनांनी आणि कशाचे आणि किती मोल देऊन पुढे गेला हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते. त्यामुळे चीनला ससा आणि भारताला कासव मानताच येत नाही आणि त्या दोघांत कोण जिंकले, याचा निकाल लावता येत नाही; कारण अर्थव्यवस्थांमध्ये शर्यत असत नाही. यामध्ये आणखी एक गंमत आहे. अगदी शर्यत असे म्हटले, तरी चीनने ही शर्यत मुळी भारताबरोबर लावलीच नव्हती. त्याची महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धेचे मोठे लक्ष्य अमेरिकेशी संबंधित राहिले आहे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत चीनची आर्थिक परिस्थिती भारताशी तुलनेने सारखीच होती. त्यामुळे ‘तेव्हा दोघे जवळपास सारखे होते, मग चीन इतका पुढे कसा गेला?’ हा प्रश्न आपल्याला सतत पडतो आणि त्यामुळे ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला आठवत राहते.