
संतोष शिंत्रे
हवामान होरपळीविरुद्धच्या झुंजीसाठी वित्तपुरवठ्याची नितांत गरज असते. पण तो नेमका आणि योग्य दिशेने होण्यासाठी ‘क्लायमेट फायनान्स टॅक्सोनॉमी’ उपयोगाला येते. मे २०२५ च्या पहिल्या काही आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्याचा पहिला मसुदा प्रकाशित केला. या प्रयत्नांची मीमांसा.
हवामान होरपळीविरुद्धची (क्लायमेट चेंज) मानवी झुंज आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. लष्कर पोटावर चालते म्हणतात; तशीच ही झुंजही पुरेशा निधीविना प्रभावी ठरू शकत नाही. या विषयातील मागील जागतिक परिषदेपासूनच अशा होरपळीला रोखण्यासाठी पुरेसा निधी किंवा वित्तपुरवठा कसा आणि कोणी द्यावा, हा एक मोठा गहन आणि गंभीर मुद्दा उपस्थित होत आला आहे; आणि पुढील सर्वच परिषदा तो निश्चित गाजत राहील. भारताला असा पुरवठा एकतर विकसित राष्ट्रांकडून होतो,किंवा देशांतर्गत खासगी (एतद्देशीय किंवा परकी) गुंतवणुकीद्वारे होऊ शकतो.