

India Defence Policy
esakal
ले. जन. एस. एस. हसबनीस, पीव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी (निवृत्त)
भारताच्या संरक्षण धोरणाच्या या ऐंशी वर्षांच्या प्रवासाचाही अभिमान बाळगला पाहिजे. आत्मविश्वासपूर्ण सामरिक भूमिकेपर्यंतचा हा प्रवास अनेक खडतर टप्प्यातून घडला आहे. आज भारताकडे केवळ आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याची क्षमता नाही, तर जगात स्वाभिमानाने, स्वावलंबीपणे आणि ठामपणे उभे राहण्याचे सामर्थ्यही आहे.
स्वातंत्र्य दिन हा केवळ भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तो मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या असंख्य सैनिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याचाही दिवस आहे. त्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा राष्ट्र सदैव ऋणी राहील. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सैनिकांच्या पराक्रमाबरोबर दूरदृष्टीचे राष्ट्रीय धोरण, सक्षम नेतृत्व, आधुनिक शस्त्रसज्जता, स्वदेशी तंत्रज्ञान आणि समर्थ अर्थव्यवस्था यांचीही तितकीच आवश्यकता असते. गेल्या ऐंशी वर्षांत भारताने या सर्व क्षेत्रांत केलेली वाटचाल ही एका नवस्वतंत्र राष्ट्रापासून आत्मविश्वासपूर्ण, सामरिकदृष्ट्या सक्षम, अण्वस्त्रसज्ज आणि आत्मनिर्भर भारतापर्यंतच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी आहे.