

India aviation market analysis
esakal
भारताचा आर्थिक विकास होत आहे, तसा हवाई क्षेत्राचाही विस्तार होत आहे. हवाई वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अमेरिका आणि चीनपाठोपाठ भारत हा तिसरा देश आहे. २०२४मध्ये भारतामध्ये देशांतर्गत आणि देशाबाहेर १७.४ कोटी प्रवाशांनी हवाई प्रवास केला. जगभरातील हवाई प्रवाशांमध्ये भारतातील प्रवाशांचे प्रमाण ४.२ टक्के आहे. व्यापार आणि गुंतणुकीबरोबरच ज्ञानाची देवाणघेवाण आणि नावीन्यपूर्ण कल्पनांसाठी हवाई वाहतुकीमुळे चालनाच मिळते. रोजगार, आर्थिक कामकाज, आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक संपर्क यांमध्ये हवाई क्षेत्रामुळे सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावते, असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयएटीए) जून २०२५मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये विस्तारणाऱ्या भारतीय हवाई क्षेत्राविषयी विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे.
दहा वर्षांमध्ये भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र वेगाने विस्तारले असून, १५ वर्षांमध्ये विमान प्रवाशांची संख्या ७ कोटींवरून १७ कोटींच्या पुढे गेली आहे. याच काळामध्ये अनेक विमान कंपन्या सुरू झाल्या आणि बंदही पडल्या. प्रवाशांची संख्या वाढत असली, तरीही वाढत्या स्पर्धेमध्ये महसूल-नफ्याचे गणित निश्चित करणे कंपन्यांसाठी खूपच आव्हानात्मक ठरले आहे.