
‘बुद्धीची निर्यात करणारा देश’ ही ओळख बाजूला सारून आता आपण ‘ज्ञानाचे केंद्र’ ही आपली प्राचीन ओळख परत मिळवू शकतो. अमेरिकेला असलेले वलय लयास जाताना भारताने या बाबतीत आपली तयारी केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना इथेच जागतिक शिक्षण मिळाले, करिअरला गती मिळाली, तर ते मोठ्या संख्येने इथल्या उत्तमोत्तम शिक्षणसंस्थांना पसंती देतील.
ज वळपास दोन हजार वर्षांपूर्वी ‘नालंदा’ आणि ‘तक्षशीला’ ही जगातील अगदी सुरवातीची उच्च शिक्षणकेंद्रे भारतात होती. बौद्धिक खुलेपणा, आंतरशाखीय विद्याभ्यास आणि निर्णयप्रक्रियेत सामावलेली नैतिक मूल्यमापनाची पद्धत; यांमुळे संपूर्ण आशिया खंडातून- चीन, कोरिया, पर्शिया आणि आग्नेय आशियातूनही प्राचीन भारतीय विद्यापीठांत विद्यार्थी आणि अभ्यासक येत. आता उच्च शिक्षणाचे जागतिक चित्र पुन्हा एकदा बदलत असताना ज्ञाननिर्मितीच्या केंद्रस्थानी असलेली जागा भारत पुन्हा मिळवू शकेल. ही संधी भारताकडे येण्यासाठी ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२०’सारख्या अंतर्गत सुधारणा कामी येत आहेत.त्याबरोबरच जगातील उलथापालथ हाही एक भाग आहे.