
भारताने व्यापार वाढविण्यासाठी व्यापारातल्या वस्तूंची गुणवत्ता, डिझाइन, पुरवठासाखळी आणि ब्रॅण्डिंग या चतुःसूत्रीच्या जोरावर ‘स्पर्धात्मक फायद्या’मध्ये कशी वाढ करता येईल, हे पाहिले पाहिजे.
दे शादेशांमधला व्यापार विश्वासाने वाढतो. दरारा आणि दमदाटीने नाही. ‘ट्रम्प टॅरिफ’च्या धोरणात याचाच विसर पडलेला दिसतो. ट्रम्प यांच्या ‘परस्परशुल्क’ (रेसिप्रोकल टॅरिफ) धोरणाला कसल्याच तार्किकतेचा आधार नाही. अगदी परस्पर व्यापारशुल्काचा ‘फॉर्म्युला’ आणि अमेरिकेच्या व्यापारतुटीचा युक्तिवाद लक्षात घेऊनही हेच म्हणता येईल. या ‘ट्रम्प टॅरिफ’च्या धोरणाने जागतिक व्यापार संघटनेचे (डब्लूटीओ) व्यापार शुल्कासंबंधीचे सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत.
मग ते ‘सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्रा’संबंधीच्या (मोस्ट फेवर्ड नेशन) समान व्यापार शुल्कासंबंधी असोत वा ''डब्लूटीओ’ने घालून दिलेल्या ''ड्युटी बाऊंड''च्या मर्यादांविषयी असोत. परस्परशुल्काचा सगळाच कारभार मनमानी आणि भारताच्या संदर्भात ‘वेगळाच छुपा अजेंडा’ घेऊन मार्गक्रमण करत आहे.