

India Russia Relations
esakal
इव्हान फेतिसोव्ह - consulate_mumbai@mail.ru
दाेन राष्ट्रांची मैत्री केवळ राजनैतिक करारांतून नव्हे, तर रोजच्या जगण्यातून फुलत असते. एखाद्या चॉकलेटची गोडी, चहाचा सुगंध किंवा आवडीच्या वस्तूची गुणवत्ता दोन देशांतील मने जोडू शकते. भारत आणि रशियाच्या दृढ धोरणात्मक भागीदारीला आता अशाच लोकाभिमुख मैत्रीची जोड देण्याची संधी आहे. ग्राहक उत्पादनांच्या या देवाणघेवाणीतून व्यापारासह सांस्कृतिक नात्यांचेही नवे क्षितिज खुले होऊ शकते.
जगभरात सध्या भूराजकीय तणाव वाढत आहे. या अशांततेच्या काळात राष्ट्रांतील शाश्वत व दीर्घकालीन भागीदारीसाठी केवळ सामायिक धोरणात्मक हितसंबंधांवर टिकू शकत नाही. त्यासाठी दोन्ही देशांतील जनतेत थेट भावनिक व सामाजिक बंध घट्ट हाेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ग्राहकोपयोगी वस्तू जेवढ्या सहजतेने हे नाते जोडतात, तेवढे इतर कोणतेही माध्यम करू शकत नाही.
एखाद्या दुसऱ्या देशाचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर आर्थिक आकडेवारी किंवा राजकीय संस्थांचे चित्र क्वचितच उभे राहते. त्याऐवजी ज्याची चव चाखली आहे, जे आपण परिधान केले आहे किंवा ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्या गोष्टींशी आपण त्या देशाला जोडतो. जगभरातील कोट्यवधी लोक भारतात येत असतात. तेव्हा त्यांचा पहिलावहिला परिचय हा एखाद्या भारतीय उपाहारगृहात खाद्यसंस्कृतीशी होतो. तेथील बटर चिकनचा दरवळ आणि अस्सल भारतीय चहाची चव आपल्या देशाच्या संपन्न सांस्कृतिक वारशाची त्यांना झलक दिसते. अशा अनुभवांतूनच त्या देशाबद्दल उत्सुकता वाढते. तिथल्या प्रथा-परंपरा जाणून घेण्याची इच्छा जागरूक हाेते. सरतेशेवटी त्यांना संबंधित देशाला प्रत्यक्ष भेट देण्याची प्रेरणा मिळते.
ग्राहक उत्पादने आणि सांस्कृतिक ओळख यांच्यामधील हा परस्परसंबंध विशेषतः भारतामध्ये अधिक ठळकपणे दिसतो. देशातील प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आणि प्रतीके आहेत. महाराष्ट्र हा वडापाव, कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी साडीसाठी ओळखला जातो. गुजरात ढोकळा आणि वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे, तर तामिळनाडू मसाला डोसा, फिल्टर कॉफी आणि कांचीपुरम रेशमी साडीसाठी ओळखला जातो. या केवळ स्मरणिका किंवा दैनंदिन गरजा भागवणाऱ्या वस्तू नाहीत, तर संबंधित प्रदेशाला स्वतंत्र ओळख मिळवून देणारी प्रतीके आहेत.