Premium|India Russia Relations : सोव्हिएत काळापासून आजपर्यंत भारत-रशिया संबंधांचा प्रवास; राष्ट्रीय हित जपण्याचे आव्हान

India Russia Strategic Partnership : सात दशकांची भारत-रशिया मैत्री, सोव्हिएत काळातील संरक्षण व औद्योगिक सहकार्य, युक्रेन युद्धानंतर बदललेली जागतिक परिस्थिती आणि भारताच्या सामरिक स्वायत्ततेसमोरील आव्हाने.
India Russia Strategic Partnership

India Russia Strategic Partnership

esakal

Updated on: 

रशियाशी सात दशकांची मैत्री आणि अमेरिकेशी वाढती सामरिक भागीदारी या दोन्ही आघाड्यांवर भारताला संतुलन साधावे लागत आहे. युक्रेन युद्ध, चीनचा वाढता प्रभाव आणि रशिया-पाकिस्तान जवळीक या पार्श्वभूमीवर भारत-रशिया संबंधांची कसोटी लागणार आहे. बदलत्या जागतिक सत्तासमीकरणांत जुनी मैत्री जपत भारत आपले राष्ट्रीय हित आणि सामरिक स्वायत्तता कशी टिकवणार, याचा वेध घेणे क्रमप्राप्त ठरते.

भारत आणि रशिया यांचे संबंध केवळ पारंपरिक राजनैतिक संबंधांपुरते मर्यादित नाहीत. विश्वास, सामरिक सहकार्य, संरक्षण, ऊर्जा, अणुऊर्जा, अवकाश, विज्ञान-तंत्रज्ञान आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेविषयीचा समान दृष्टिकोन या भक्कम पायांवर ते उभे आहेत. शीतयुद्धाच्या काळातील भारत-सोव्हिएत मैत्रीपासून आजच्या ‘विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त सामरिक भागीदारी’पर्यंत (Special and Privileged Strategic Partnership) या संबंधांनी अनेक जागतिक उलथापालथींचा सामना केला आहे.

‘राष्ट्रांच्या मैत्रीला भावनांचा आधार असू शकतो; परंतु तिचे भविष्य राष्ट्रीय हितसंबंधच ठरवितात.’ भारत आणि रशिया यांच्या संबंधांकडे पाहताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. गेली सात दशके या दोन देशांनी परस्पर विश्वास, धोरणात्मक सहकार्य आणि जागतिक घडामोडींविषयीच्या अनेक समान दृष्टिकोनांच्या आधारावर एक अद्वितीय भागीदारी विकसित केली आहे. आजही भारत आणि रशिया परस्परांना ‘विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त सामरिक भागीदार’ म्हणून संबोधतात. मात्र, एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात हे संबंध एका नव्या वळणावर उभे आहेत. युक्रेन युद्ध, चीनचा वाढता प्रभाव, अमेरिकेची आशियातील वाढती सामरिक रुची, ऊर्जा सुरक्षेचे सतत बदलते स्वरूप आणि बहुध्रुवीय जगाच्या निर्मितीची प्रक्रिया या सर्व घडामोडींनी भारत व रशिया संबंधांचे स्वरूप बदलले आहे... वेगाने बदलत चालले आहे.

विश्वासाची पायाभरणी

भारत स्वतंत्र झाल्यानंतर विशेषतः सत्तरीच्या दशकात सोव्हिएत संघाने भारताला दिलेला राजकीय, औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रातील पाठिंबा यांचे भारतीय नेतृत्वाला कधीच विस्मरण झालेले नाही. भिलाई पोलाद कारखाना, अवजड उद्योग, अवकाश संशोधन, अणुऊर्जा आणि संरक्षण या सर्व क्षेत्रांत सोव्हिएत सहकार्याचा मोठा वाटा होता. भारताच्या राष्ट्रबांधणीत सोव्हिएत राष्ट्रसंघाने फार महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे, हे आजच्या पिढीला कळणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. पाकिस्तानबरोबरचा १९७१चा संघर्ष हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ होता. अमेरिका आणि रशिया अशा ध्रुवीकरणात विभागलेल्या तेव्हाच्या जगात सोव्हिएत राष्ट्रसंघाने भारताला फक्त बिनशर्त पाठिंबा दिला इतकेच नव्हे; तर भारताच्या प्रत्येक लष्करी सहाय्याच्या विनंतीला भरपूर प्रतिसाद दिला. १९७१च्या भारत-सोव्हिएत मैत्री कराराने या संबंधांना औपचारिक व नवे परिमाण दिले. बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या काळात अमेरिकेच्या सातव्या आरमाराच्या उपस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात सोव्हिएत संघ भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. याच काळात भारतीय धोरणकर्त्यांच्या मनात रशियाविषयी विश्वासाची भावना दृढ झाली. ‘गरजेच्या वेळेस मदत करतो तोच खरा मित्र’ ही मैत्रीची व्याख्या सोव्हिएत राष्ट्रसंघाने सार्थ केली.

सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर अनेकांनी भारत-रशिया संबंध कमकुवत होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र उलट घडले. २००० मध्ये सामरिक भागीदारी आणि २०१० मध्ये ‘विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त सामरिक भागीदारी’ या स्तरावर संबंधांची उंची नेण्यात आली. आजही दोन्ही देश नियमित शिखर बैठका, संरक्षण संवाद, ऊर्जा सहकार्य आणि बहुपक्षीय मंचांवरील समन्वय कायम ठेवून आहेत. मात्र, आजची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीची आहे. रशिया-युक्रेन युद्ध, रशिया-अमेरिका संघर्ष, अमेरिकेने लादलेले निर्बंध, अमेरिकेबरोबर भारताचा वाढता सहभाग, चीन आणि रशिया जवळीक आणि रशिया-पाकिस्तान यांच्यातील वाढता संवाद, या सर्व घडामोडींचे पडसाद भारताच्या परराष्ट्र धोरणावर उमटत आहेत.

२०२५च्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही देशांनी राजकीय, संरक्षण, व्यापार, ऊर्जा, अणुऊर्जा, अवकाश, विज्ञान-तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक दृढ करण्याची बांधिलकी पुन्हा व्यक्त केली. भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांची मुळे मात्र आधुनिक राजनैतिक संपर्काच्या कितीतरी आधीच्या काळात रुजलेली आहेत. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत पोहोचणाऱ्या या ऐतिहासिक संबंधांचा मागोवा घेतल्यास, दोन्ही देशांमधील परस्पर संपर्काला अनेक शतकांची पार्श्वभूमी असल्याचे दिसून येते.

मध्ययुगीन काळात मध्य आशिया, पर्शिया आणि व्यापारी मार्गांद्वारे भारत व रशियातील प्रदेशांमध्ये अप्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित झाला. पंधराव्या शतकात रशियन प्रवासी अफानासी निकितिन याने भारताला भेट दिली. त्याच्या ‘जर्नी बियाँड थ्री सीज’ (Journey Beyond Three Seas) या प्रवासवर्णनातून तत्कालीन भारतीय समाजजीवन, व्यापार आणि जीवनपद्धतीचे चित्रण समोर येते. पुढील शतकांमध्ये रशियन साम्राज्याचा मध्य आशियाकडे विस्तार होत असताना भारताविषयीची राजकीय, व्यापारी आणि भौगोलिक उत्सुकताही वाढत गेली. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत ब्रिटिश भारत अन् रशियन साम्राज्य यांच्यात मध्य आशियातील वर्चस्वासाठी स्पर्धा निर्माण झाली. इतिहासात ही स्पर्धा ‘द ग्रेट गेम’ (The Great Game) म्हणून ओळखली जाते. या काळात भारत आणि रशिया यांचे संबंध प्रामुख्याने साम्राज्यवादी राजकारणाच्या व्यापक संदर्भात आकार घेत होते. आधुनिक अर्थाने भारत-रशिया मैत्री किंवा थेट द्विपक्षीय भागीदारी तेव्हा अस्तित्वात नव्हती. तथापि, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी रशियातील क्रांतिकारी विचार, समाजवाद आणि साम्राज्यवादविरोधी चळवळींचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही विचारवंतांवर प्रभाव पडू लागला. १९१७च्या रशियन क्रांतीनंतर वसाहतवादविरोधी संघर्ष आणि राष्ट्रीय मुक्तीच्या विचारांना जागतिक स्तरावर नवे वैचारिक परिमाण प्राप्त झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध प्रवाहांनी या घडामोडींकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहिले... काहींना त्यात सामाजिक समतेची आणि साम्राज्यवादाविरोधातील संघर्षाची प्रेरणा दिसली; तर इतरांनी त्याच्या राजकीय व वैचारिक मर्यादांवरही चर्चा केली. अशा प्रकारे, भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांचा प्रवास थेट राजनैतिक मैत्रीपेक्षा प्रवास, व्यापार, वैचारिक देवाणघेवाण आणि साम्राज्यवादी राजकारणाच्या परस्परसंवादातून विकसित झाला. पुढे १९१७च्या रशियन क्रांतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काही प्रवाहांना नवी वैचारिक प्रेरणा दिली आणि वसाहतवादविरोधी संघर्षाला आंतरराष्ट्रीय संदर्भ प्राप्त करून दिला. म्हणूनच, स्वातंत्र्योत्तर भारत-रशिया मैत्रीचा पाया १९४७ नंतरच्या राजनैतिक संबंधांत असला, तरी तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी अनेक शतकांच्या संपर्कात आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी विकसित झालेल्या साम्राज्यवादविरोधी विचारांत शोधता येते.

Loading content, please wait...