

India Semiconductor Mission
esakal
अजित चिगटेरी, प्रमुख, सेमीकंडक्टर परिसंस्था विकास गट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर
आज आपला देश ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ध्वजारोहण करून आपण हा दिवस साजरा करीत असलो, तरी स्वातंत्र्याचा अर्थ आणि त्याचे महत्त्व त्यापेक्षा खूप व्यापक आहे. शिक्षण, कृषी, उत्पादन व सेवा उद्योग, अर्थव्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास व त्यातील प्रगती या सर्व क्षेत्रांत मजबूत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हे स्वातंत्र्य एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. आपला देश केवळ तंत्रज्ञान स्वीकारणारा न राहता आता तंत्रज्ञान पुरविणारा देश म्हणून परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
परिवर्तनाचे सर्वांत चांगले उदाहरण कोणते असेल, तर ते सेमीकंडक्टर उद्योगासाठी आपण निर्माण करत असलेले स्वावलंबन आणि स्वातंत्र्य होय. भारत हा सेमीकंडक्टर चिपच्या रचना-विकासासाठी विश्वासार्ह केंद्र म्हणून आधीपासूनच ओळखला जातो. मात्र, या क्षेत्रात काही परदेशी सहकार्य आणि जगातील आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती. आता आपण त्यापुढे मोठी मजल मारली आहे. संशोधन व विकासापासून सेमीकंडक्टर निर्मितीपर्यंत संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्थेचा भक्कम पाया भारतात घातला गेला आहे. यामध्ये कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंतची, तसेच तयार उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतची पुरवठा साखळीही समाविष्ट आहे.