

India and Southeast Asia Relations
esakal
डॉ. पुलिंद सामंत- sakal.avtaran@gmail.com
भारत आणि आग्नेय आशियाचे नाते केवळ व्यापार, धर्म आणि संस्कृतीपुरते मर्यादित नव्हते; त्याला रक्तसंबंधांचाही आधार होता. प्राचीन स्थलांतरे आणि राजवंशांच्या वारसांच्या देवाणघेवाणीतून हे नाते अधिक घट्ट झाले. या ऐतिहासिक संदर्भांतून भारत आणि सुवर्णभूमी यांच्यातील परस्पर संबंधांचे वेगळे पैलू उलगडतात.
गेल्या लेखात आपण भारत आणि आग्नेय-आशियादरम्यान भूतकाळात झालेल्या भौतिकदृष्ट्या, म्हणजे सुखी जीवन जगण्याबाबतच्या, महत्त्वाच्या देवाणघेवाणीचा आढावा घेतला. पुढच्या टप्प्याकडे अभौतिक स्वरूपाच्या देवाणघेवाणीच्या आढाव्याच्या अपेक्षेने वाचकांनी पाहणे साहजिक आहे. मात्र ते करण्यापूर्वी एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूचा परामर्श घेणे आवश्यक आहे. तो आहे भारतीय आणि आग्नेय-आशियाई लोकसमूहांतर्गत परस्पर नातेसंबंधांचा. अचूकपणे बोलायचे झाल्यास रक्तसंबंधांचा. यासंदर्भात सर्वप्रथम लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आधुनिक विज्ञानाने आपल्याला दिलेली माहिती - आफ्रिका खंडातून बाहेर पडलेला पहिला मानव एक लाख वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात आला आणि ७५ हजार वर्षांपूर्वी तो तिथून आग्नेय-आशियात पोहोचला, जिथून पुढे तो दोन विरुद्ध दिशांना (उत्तरेला चीन आणि दक्षिणेला ऑस्ट्रेलिया) विभागून चालता झाला. याचाच अर्थ भारतीयांचा आणि आग्नेय-आशियाई लोकांचा थेट रक्तसंबंध आहे, असा होतो. त्यापुढच्या हजारो वर्षांत अर्थात अनेकविध घडामोडी आणि मूळ परिस्थितीत अनेक प्रकारची स्थित्यंतरे घडली असणार यात शंका नाही. मात्र, भारतीय उपखंड आणि आग्नेय-आशिया उपखंड यांचे वांशिक नाते घट्ट करणाऱ्या पूरक घटनासुद्धा वेळोवेळी घडत गेल्या.