

India Southeast Asia Cultural Relations
esakal
डॉ. पुलि ंद सामंत - sakal.avtaran@gmail.com]
भारत आणि आग्नेय आशियातील सांस्कृतिक संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नव्हते. भाषा, लिपी, साहित्य, धर्म, स्थापत्य आणि शिल्पकलेच्या माध्यमातून या संबंधांनी समृद्ध वारसा निर्माण केला. भारतीय प्रेरणा आणि स्थानिक कलासामर्थ्याच्या संगमातून साकारलेली ही वारसा स्थळे दोन्ही संस्कृतींच्या अभिजात सहप्रवासाची साक्ष देतात.
भौतिक स्वरूपाची देवाण-घेवाण मुख्यत: व्यापाराच्या माध्यमातून; तर कधी कदाचित उपकाराच्या परतफेडीतून भारत आणि आग्नेय-आशियाच्या दरम्यान सुरुवातीला घडत आली. त्या माध्यमातून झालेला आणि भावलेला परस्पर-परिचय कालौघात घट्ट झाला अन् त्यातून पुढे मोठ्या प्रमाणावर रक्त-संबंध प्रस्थापित झाले... अनेकविध नातेसंबंधांचे दाट जाळे भारत आणि आग्नेय-आशिया या दोहोंत निर्माण झाले. याच नातेसंबंधांच्या जाळ्याच्या माध्यमातून पुढे अ-भौतिक बाबींची देवाण-घेवाण अतिशय नैसर्गिक पद्धतीने, जणू दूरच्या ठिकाणी कायमची वस्ती करण्यास गेलेल्या नातेवाइकांच्या हिताच्या दृष्टीने मूळ स्थानी असलेले आप्त त्यांना वेळोवेळी काय हवे-नको याकडे नजर ठेवून असतात, अशा प्रकारे झाली असावी.