
Operation Megh Rahat
esakal
मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)
mohinigarge2007@gmail.com
युद्धमोहीम सुरू होती. भारतीय सैनिक अहोरात्र लढत होते. मात्र, नेहमीच्या शस्त्राशिवाय! शत्रूही सीमा ओलांडून आत आलेला नव्हता..! युद्धभूमी तशी ओळखीची - काश्मीर! तिथली थंडी आणि हिमवृष्टी हेही सैनिकांनी अनुभवलेलं होतं, पण या वेळी निसर्गाचं वेगळंच रौद्ररूप त्यांच्या समोर होतं. २०१४ चा सप्टेंबर उजाडताच पावसाची संततधार सुरू झाली. सुरुवातीला हा पाऊस नेहमीचा वाटत होता, मात्र २ तारखेपासून त्याने भीषण रूप धारण केलं.
काश्मीरमधली अनेक गावं पावसाच्या तडाख्यात सापडली. दक्षिण काश्मीरमध्ये ढगफुटी झाली. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले, संपर्क तुटला. शतकांपासून अनेक लढायांची साक्षीदार असलेली झेलम नदी त्यावेळी स्वतः आक्रमक झाली होती. श्रीनगरमध्ये धोक्याची पातळी ओलांडत ती प्रचंड वेगाने वाहू लागली. येईल त्याला हा जलप्रवाह कवेत घेऊ लागला. अनेक पर्यटक श्रीनगर पुराच्या विळख्यात सापडले.