
विसाव्या शतकाचं अर्धशतक संपलं आणि भारतातील चित्रपट उद्योगानं उसळी घेतली. कालपर्यंत गुलामीत जखडलेल्या या देशाचं सर्व सांस्कृतिक वैभव या नव्या पाश्चात्त्य तंत्राच्या सिनेमाच्या पडद्यावर जणू मावेना... तलवारबाजी, राजपुत्र, राजकन्या यांच्या कहाण्या आणि आधुनिक विश्वातले भीषण वास्तव यांच्या कथा या रजतपटावरील परिकथा झाल्या... ‘आजाओ तडपते हैं अरमाँ’ची साद जणू गतजन्माची खूण असल्यासारखी ऐकू आली...
स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच चित्रपट उद्योगाने चांगला जोर धरला. भारतीय चित्रपटनिर्मिती वर्षाला २५० इतकी होऊ लागली. अमेरिकन चित्रपट उद्योगाच्या खालोखाल. जवळजवळ शंभर निर्माते उतरले होते मैदानात. मूकपटापासून कामं करणाऱ्या मेहबूब खान यांनी एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाची घोषणा केली. दाक्षिणात्य निर्माते एस. एस. वासन यांच्या ‘जेमिनी’च्या ‘चंद्रलेखा’ने सर्वांचे डोळे दिपले होते! ४९ सालच्या ‘अंदाज’नंतर मेहबूब खान हॉलीवूडची वारी करून आले होते. तयारी परिपूर्ण केली तरी अखेर चित्रपट निर्मिती म्हणजे बेभरवशाची निसरडी वाट.