

Ruturaj Gaikwad
esakal
भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवणे खूप कठीण काम असते. खासकरून फलंदाजाच्या जागेसाठीची स्पर्धा अजून कठीण असते. महाराष्ट्राचा कष्टकरी आणि शैलीदार फलंदाज ऋतुराज गायकवाडला मोठ्या काळानंतर भारतीय संघातून खेळायची संधी मिळाली. फलंदाजी करताना शांत चेहरा बघून त्याची मानसिक कणखरता दिसून आली.
कष्ट, मेहनत, सातत्य, तन्मयता असे अगदी सगळे गुण एक खेळाडू घडवायला मोलाचे असतात, यात शंका नाही. तरीही कोणाही महान खेळाडूला विचारा की हे सगळे जागेवर असले म्हणजे खेळात यश मिळतेच असे आहे का? तर त्याचे उत्तर नाही असे मिळेल. कारण एक खेळाडू खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायला वर नमूद केलेल्या गुणांना जिद्दी स्वभावाची आणि एका अदृश्य गोष्टीची जोड लागते. त्याला तुम्ही नशीब, योगायोग किंवा काहीही नाव द्या. चित्रांच्या असंख्य तुकड्यांचे कोडे सोडवतात तशी अवस्था असते. कधी कधी काही केल्या कोडे सुटत नाही, तर कधीतरी सगळ्या गोष्टी आपसूक जमून येतात. खेळाडूंना अनेक वेळा असा अनुभव येतो.