

Nishad Naravane's Journey
esakal
सुनंदन लेले - sdlele3@gmail.com
भारतीय खेळाडू क्रिकेट, हॉकी, मुष्टियुद्ध, नेमबाजी, बुद्धिबळ अशा काही मोजक्या खेळ प्रकारात चमकू शकतात. बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, टेनिस एकेरी, १०० मीटर पळणे म्हणजेच ट्रॅक अँड फिल्ड वगैरे खेळ प्रकारात नाव नाही कमवू शकत. खास करून पोहणे आणि जिम्नॅस्टिक्सच्या खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने मोठी कामगिरी केल्याचे चटकन ऐकिवात येत नाही. प्रथम अभिनव बिंद्राने भारताला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून दिले. नंतर नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक कमावले. इतकेच काय दीपा करमाकर सारख्या जिमनॅस्टने भारतीय खेळाडू या खेळातही कमाल करून दाखवू शकतात याची झलक दिली. हे सांगण्याचे कारण असे आहे, की भारतीय कनिष्ठ जिम्नॅस्टिक्स संघाने एक अशी कमाल कामगिरी याच महिन्यात नव्हे तर अगदी काही दिवसांपूर्वी करून दाखवली. जी आपल्या नजरेत किंवा ऐकण्यात आली नाही. त्याचे कारण असे होते, की एकीकडे क्रिकेटचा रगडा चालू असताना दुसरीकडे फिफा फुटबॉल विश्वचषक चालू असल्याने माध्यमांची नजर तिकडेच आहे. परिणामी या भारतीय संघाच्या कामगिरीला योग्य प्रसिद्धी मिळाली नाही. नक्की काय केले या संघातील खेळाडूंनी हे कळावे म्हणून हा लेख तुमच्या समोर मांडतोय.
पुण्यातील नरवणे नावाचे कुटुंब. आईवडील दोघे उच्च शिक्षित. त्यांनी निषाद नावाच्या आपल्या एकुलत्या एक मुलाला चार वर्षांचा असतानाच खेळायला मैदानावर पाठवले. नंतर पोहण्याच्या प्रशिक्षणाला पाठवले. निषादला पोहता यायला लागले तरीही त्याचे मन तलावावर रमत नव्हते. म्हणून मग मिलिंद नरवणेने निषादला पुण्यातील मिलेनियम शाळेतील जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षणाला घातले. निषादचे पहिले प्रशिक्षक अजित करांडे होते. ज्यांनी या खेळातील प्रशिक्षणाचा जोरदार आणि शास्त्रीय अभ्यास केला होता. चांगल्या वातावरणातील प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली निषाद नरवणेची प्रगती झपाट्याने झाली. दोन वर्षांतच करांडे सरांबरोबर निषादने सातव्या वर्षी फिलिपिन्समधील स्पर्धेत भाग घेतला. कमावते असल्याने नरवणे दांपत्याने मुलाच्या प्रगतीसाठी योग्य निधी सतत साठवत उपलब्ध करून दिला.