
कोविडच्या काळात झालेले मृत्यू लपवले. कुंभमेळ्यात झालेली दुर्घटना शेवटपर्यंत नीट कळली नाही. पहलगाम हल्ल्यात सुरक्षेच्या बाबतीत एवढी मोठी चूक का झाली ते अजूनही विचारलं जात नाही. टीआरपी घोटाळा बातमीमधून गायब झाला. अनेक स्वतंत्र माध्यमांवर बंदी आली. वृत्तवाहिन्या शांत राहिल्या. पत्रकारांना अटक झाली. बरेचसे पत्रकार शांत राहिले. अशा वेळी सामान्य माणूस जास्त अस्वस्थ होतो. आज पहलगाम हल्ल्यानंतर समाजमाध्यमावर ‘कुछ बडा होनेवाला है’ अशा भंपक प्रतिक्रिया देणारे लोक पाहिले की काय वाटतं? युद्धाच्या तद्दन खोट्या बातम्या देणारं न्यूज चॅनल बघून काय वाटतं? इस्लामाबाद जिंकलं, अशा बातम्या चालवल्या गेल्या. लोक रात्र रात्र जागून आनंद साजरा करत राहिले.
सकाळी लक्षात आलं, की फेक न्यूज होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वासघात कुठल्याच काळात कुठल्याच मीडियाने केला नव्हता. खरं तर युद्ध असं चॅनल किंवा समाजमाध्यम वापरून खेळतात का? गेले काही दिवस हिंदी न्यूज चॅनल बघून किळस वाटू लागलीय. हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो; पण आज याची काय अवस्था करून टाकलीय या बहुतांश हिंदी इंग्रजी चॅनल्सनी? त्या चॅनल्सवर बोलणारे पत्रकार आपल्या आई-वडिलांना काय तोंड दाखवत असतील? मागे एक पत्रकार खासगीत म्हणाला, ‘माझ्या मुलांना मी सांगितलं की न्यूज चॅनल बघू नका.’ काय बोलणार? पण लोक याच लोकांच्या अतिरंजित बातम्या ऐकून उगाच उर बडवायला लागतात.