
ठाणे कारागृहाभोवतालच्या दगडी भिंती म्हणजे एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीसारखी उंच दगडी तटबंदी. किल्ल्याच्या मुख्य दरवाजासारखा भव्य मजबूत लोखंडी दरवाजा. तो इतका मजबूत असतो, की उघडायलाच पाच-सहा मजबूत गडी हवेत. किल्ल्याचं ठीक आहे, आत तमाम प्रजा असते. त्या दगडी भव्यतेत प्रजेची काळजी असते. परंतु कारागृहाला भव्य लोखंडी दरवाजा असण्यामागे आतल्या कैद्यांची काळजी यापेक्षाही बाहेरच्या समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींना जेरबंद करून समाज आणि कारागृह अशी अभेद्यता निर्माण करणं, हाच हेतू अधिक असावा. इथे आतल्या प्रजेची नाही, तर बाहेरच्या समाजाची काळजी अधिक असते.
दोन-एक तास वाट पाहिल्यानंतर अखेर ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या त्या भल्यामोठ्या दरवाजातील खिडकीसारखा असणारा पोटदरवाजा उघडला. आम्ही कारागृहात पाऊल टाकेपर्यंत दहा वाजून गेले होते. आत गेल्यावर उजवीकडे आणि डावीकडे काही पायऱ्या चढून उंचावर तुरुंग अधिकाऱ्यांचे कार्यालय. दोन्ही बाजूंना कारागृह अधिकाऱ्यांचे उंचीवर असलेले कक्ष. ते इतक्या उंचीवर होते, की कैद्याला त्याच्या सामाजिक खुजेपणाची जाणीव व्हावी. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद दरवाजापासूनच सुरू झाला.